Sun, Mar 24, 2019 13:02होमपेज › Satara › जलयुक्‍त शिवार अभियानाची किमया 

औंध मंडलात आठ गावात २७०० टी.सी.एम. पाणीसाठा

Published On: Jan 19 2018 2:00AM | Last Updated: Jan 18 2018 8:52PMऔंध : वार्ताहर

औंध मंडलामध्ये मागील चार वर्षामध्ये जलयुक्त शिवार योजनेची कामे मोठ्या प्रमाणात झाल्याने दुष्काळी भागातील सिमेंट बंधारे, माती बंधारे, डि.प.सी.सी.टी.ची कामे मार्गी लागली असून या माध्यमातून  2790 टि.सी.एम. पाणी साठा होण्यास मदत झाली आहे.

याबाबतची माहिती औंधचे मंडल कृषी अधिकारी अनिल महामुलकर यांनी दिली. महामुलकर म्हणाले, सन 2016 2017 मध्ये सुधारित आराखड्यासह  औंध मंडलातील सात गावांसाठी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत 705 कामे मंजूर झाली होती. त्यामध्ये 627 कामे पूर्ण झाली आहेत. सिमेंट बंधार्‍यांची 46 कामे, माती नाला बांधाची 40 तसेच   मातीनाला बांध दुरुस्तीची 20 व सिमेंट बांध दुरुस्तीची 16 कामे, कम्पार्टमेंट बंडींग 16 कामे 305 हेक्टरमध्ये, नाला खोलीकरण 46 कामे, वरुड येथे सिद्धीविनायक ट्रस्टच्या माध्यमातून खोल समतल चरीचे  पंचावन्न हेक्टरचे काम पूर्ण करण्यात आले आहे. 2015 -2016 सालामध्ये पाण्याची तूट एक हजार नऊशे सत्तर टी.सी.एम.होती. या कामांमुळे पाणी साठवण क्षमता दोन हजार दहा टी.सी.एम.एवढी झाली आहे तर सन 2016 2017 मध्ये पाण्याची  तूटही एक हजार चारशे पंचेचाळीस टी.सी.एम. होती. पूर्ण झालेल्या कामांमुळे 780 टी.सी.एम. एवढा पाणीसाठा झाला आहे. 

त्याचबरोबर औंध मंडलातील भोसरे गावाने वॉटरकप स्पर्धेत राज्यात द्वितीय क्रमांक मिळविला तर जायगावने तालुका गटात तिसरा क्रमांक पटकावून दोन्ही गावांनी श्रमदानातून पाणी बचतीचे महत्त्व सर्वांना पटवून दिले आहे. प्रत्येक गावातील युवक, नागरिक, महिलांनी एकजुटीने श्रमदान केल्यास  दुष्काळी पट्ट्यातील पाणी टंचाई दूर होण्यास निश्‍चित मदत होणार आहे.

त्यासाठी प्रत्येकाजवळ प्रखर इच्छाशक्तीची गरज आहे. यासाठी तळागाळापर्यंत जलसाक्षरता अभियान पोहोचविणे गरजेचे बनले आहे. छोट्या छोट्या कामांमधून मोठ्या प्रमाणात पाणी बचत होण्यास मदत होत असून यापुढील काळातही सूक्ष्म पध्दतीने औंध मंडल विभागाच्या वतीने  जल अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी कृषी पर्यवेक्षक विजय वसव,पी.पी.आटपाडकर व  सर्व कृषी सहायक, कर्मचारी परिश्रम घेत आहेत.