Wed, Feb 26, 2020 23:11होमपेज › Satara › सातारा जिल्ह्यात विधानसभेचे पंचवीस लाख मतदार

सातारा जिल्ह्यात विधानसभेचे पंचवीस लाख मतदार

Published On: Sep 21 2019 12:45PM | Last Updated: Sep 21 2019 12:00AM

संग्रहित छायाचित्रसातारा : प्रतिनिधी

जिल्हा प्रशासनाकडून विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांत 25 लाख 21 हजार 165 एकूण मतदार आहेत. माण-खटाव विधानसभा मतदासंघात सर्वाधिक 3 लाख 40 हजार 97  मतदार आहेत. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली राबवलेल्या मतदार नोंदणी मोहिमेमुळे मतदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.
जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आयाराम-गयारामांची आयात-निर्यात सुरू आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. राजकीय नेत्यांकडून बूथ लेव्हल कमिट्यांपर्यंत मोर्चेबांधणी झाली असली, तरी जिल्हा प्रशासनाकडूनही तयारी सुरू आहे. 

विधानसभा निवडणुकीसाठी ’बेला’ कंपनीची  5 हजार 530 बॅलेट युनिट, 3 हजार 980 कंट्रोल युनिट तर 4 हजार 292 व्हीव्हीपॅट दाखल झाले.  त्यापैकी  5 हजार 212 बॅलेट युनिट, 3 हजार 723  कंट्रोल युनिट तसेच 4 हजार 820 व्हीव्हीपॅटची द्वितीय स्तरावरील तपासणी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे. या मशीन्स लवकरच मतदानासाठी सज्ज होत आहेत. जिल्हा निवडणूक शाखेच्या उपजिल्हाधिकारी मोनिका ठाकूर यांच्याकडून दररोज निवडणूक कामकाजाचा आढावा घेतला जात आहे. जिल्ह्यातील मतदारांची आकडेवारी निश्चित करण्याचे काम सुरु आहे. 

सातारा लोकसभा निवडणकीसाठी सुमारे 18 लाख मतदार संख्या होती. त्यामध्ये फलटण व माण विधानसभा मतदारसंघाचा समावेश नव्हता. मात्र, विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही मतदारसंघ जिल्ह्यात मोडत असल्याने या निवडणुकीत मतदारांची संख्या वाढणार आहे. सातारा-जावली विधानसभा मतदारसंघात 3 लाख 36 हजार 209 मतदार  आहेत. त्यामध्ये 1 लाख 70 हजार 984 पुरुष, 1 लाख 60 हजार 576 स्त्री तर 1 तृतीयपंथी असे मतदार आहेत. वाई-महाबळेश्वर-खंडाळा विधानसभा मतदारसंघात 1 लाख 67 हजार 7 पुरुष, 1 लाख 64 हजार 32 स्त्री तर 5 तृतीयपंथी असे 3 लाख 31 हजार 44 मतदार आहेत. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात 1 लाख 53 हजार 529 पुरुष, 1 लाख 45 हजार स्त्री असे 2 लाख 19 हजार 597 मतदारांचा समावेश आहे.

माण-खटाव विधानसभा मतदारसंघात 1 लाख 75 हजार 367 पुरुष, 1 लाख 64 जार 730 स्त्री असे सर्वाधिक 3 लाख 40 हजार 97 मतदार आहेत. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात 1 लाख 49 हजार 345 पुरुष, 1 लाख 42 हजार 693 स्त्री तर 1 तृतीयपंथी असे 2 लाख 92 हजार 39 मतदार आहेत. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात 1 लाख 50 हजार पुरुष, 1 लाख 41 हजार 615 स्त्री तर 2 तृतीयपंथी असे एकूण 2 लाख 91 हजार 832 मतदार आहेत. या मतदारसंघात सर्वात कमी मतदार आहेत. पाटण विधानसभा मतदारसंघात 1 लाख 51 हजार 297 पुरुष, 1 लाख 48 हजार 538 स्त्री तर 9 तृतीयपंथी असे एकूण 3 लाख 36 हजार 209 मतदार आहेत. जिल्ह्यात 12 लाख 86 हजार 639 पुरुष, 12 लाख 34 हजार 507 स्त्री तर 19 तृतीयपंथी असे 25 लाख 21 हजार 165 मतदारसंख्या आहे.  

जिल्ह्यात 12 हजार 39 दिव्यांग मतदार तर 12 हजार 619 सैनिक मतदार आहेत.  गेल्याच महिन्यात मतदार यादी प्रसिध्द झाली होती. अद्याप पुरवणीची यादी प्रसिध्द झाली नाही. त्यामुळे मतदारांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. मतदार संख्या वाढावी यासाठी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालये यांसह गावागावांत विविध उपक्रम राबवले. त्यामुळे सुमारे सव्वा लाखाहून अधिक मतदारांची संख्या वाढली. मतदार जागृती अभियानामुळे गत लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतदानात 4 टक्क्यांनी वाढ झाली.