Thu, Jun 20, 2019 20:40होमपेज › Satara › मेडिकल कॉलेजसाठी 25 एकर जागा 

मेडिकल कॉलेजसाठी 25 एकर जागा 

Published On: May 30 2018 2:23AM | Last Updated: May 30 2018 12:06AMमुंबई/सातारा : विशेष प्रतिनिधी

सातारच्या मेडिकल कॉलेजसाठी कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाची कृष्णानगर परिसरातील सुमारे 25 एकर जागा कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या कॉलेजच्या उभारणीनंतर जिल्ह्यातील गरजू रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार असून विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय शिक्षणाची कवाडे दृष्टिक्षेपात येणार आहेत. दै.‘पुढारी’ने यासंदर्भात सातत्याने केलेल्या पाठपुराव्याचे हे मोठे यश समजले जात आहे.

सातारच्या मेडिकल कॉलेजचा प्रश्‍न गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळत पडला होता. मंगळवारी मात्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रश्‍न मार्गी लागला. सातारच्या या प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी महाराष्ट्र कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाची जागा कायमस्वरूपी हस्तांतरित करण्यासही बैठकीत मान्यता देण्यात आली.  शासनाकडून सातारा येथे 100 विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि 500 खाटांचे संलग्नित रुग्णालय सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या निकषानुसार वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेस सलग 25 एकर जागा आवश्यक असते. गरजू रुग्ण व वैद्यकीय शिक्षण घेेणार्‍या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी महाविद्यालयाचा परिसर सातारा शहरालगत असणे आवश्यक आहे. त्यामुळे कृष्णा खोरे विकास महामंडळाची जागा विनाअट व विनामूल्य हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात आली.

नियामक मंडळाच्या 31 जुलै 2013 रोजी झालेल्या 77 व्या बैठकीत ठराव क्र. 77/8 नुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी व 100 रुग्ण खाटांचे संलग्नीत रुग्णालयासाठी तसेच 100 खाटांचे महिला रुग्णालयासाठी काही अटी व शर्तीच्या अधीन राहून 50 एकर जागा देण्यास नियामक मंडळाची मान्यता देण्यात आली आहे. 

‘पुढारी’ ने वेधले होते मुख्यमंत्र्यांचे लक्ष 
सातारच्या मेडिकल कॉलेजचा प्रश्‍न दै. ‘पुढारी’ने अजेंड्यावर घेतल्यानंतर लोकप्रतिनिधींनीही पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस गतवर्षी सातारा दौर्‍यावर आले, तेव्हा ‘पुढारी’ने ‘मुख्यमंत्री महोदय सातार्‍याकडे कानाडोळा नको’ अशा आशयाची लीड बातमी प्रसिद्ध करून मेडिकल कॉलेजच्या उभारणीकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी मेडिकल कॉलेजबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले होते. मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाने जागेचा प्रश्‍न मार्गी लावल्याने मेडिकल कॉलेज उभारणी दृष्टिक्षेपात आली आहे. या नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न रुग्णालय सुरू झाल्यानंतर सातारा शहर तसेच जिल्ह्यातील गरजू रुग्णांना विशेष वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहेत. हा प्रकल्प पूर्णत: शासनाचा असून नियोजित वैद्यकीय महाविद्यालयामुळे गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमाची संधी उपलब्ध होणार आहे.