Thu, Apr 25, 2019 11:59होमपेज › Satara › २३ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर

२३ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर

Published On: Apr 24 2018 1:07AM | Last Updated: Apr 23 2018 10:41PMसातारा : प्रतिनिधी

जून ते सप्टेंबर या कालावधीत मुदत संपणार्‍या व नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासह सदस्यांसाठी जिल्ह्यातील 23 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक दि. 27 मे रोजी होत आहे. निवडणुकीसाठी दि. 7 मेपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. सार्वत्रिक निवडणुकीसोबत  409 ग्रामपंचायतींमधील 777 रिक्‍त जागांसाठीही निवडणूक घेतली जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने नुकताच निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.

जून ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यातील 23 ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. त्यामध्ये कोरेगाव तालुक्यातील तडवळे सं. कोरेगाव, कोंबडवाडी, चोरगेवाडी, चांदवडी, कण्हेरखेड, आसरे, बोबडेवाडी; जावली तालुक्यातील कुंभारगणी, कुरळोशी, गाढवली (पुनर्वसन); पाटण तालुक्यातील नारळवाडी, जमदाडवाडी, कळकेवाडी, मरळी, रामिष्टेवाडी, मल्हारपेठ, येराडवाडी, गव्हाणवाडी, नवसरवाडी, मंद्रुळ कोळे, मंद्रुळ कोळे खुर्द; माण तालुक्यातील सत्रेवाडी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. 

या निवडणुकीसाठी दि. 27 रोजी तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणार आहेत. दि. 7 ते 12 मेपर्यंत सकाळी 11 ते दुपारी 4.30 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागवणे व सादर करण्याची मुदत आहे. त्यानंतर दि. 14 मे रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. दि. 16 मे रोजी  दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेता येणार असून त्यानंतर उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करून त्यांना चिन्हवाटप केले जाणार आहे. दि. 27 मे रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदान होणार आहे. तहसीलदारांनी निश्‍चित केलेल्या ठिकाणी दि. 28 मे रोजी सकाळपासून मतमोजणी होणार आहे.

दरम्यान, सार्वत्रिक तसेच पोटनिवडणूक होत असलेल्या ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे. ही आचारसंहिता निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत कायम राहणार असून कुठल्याही नेत्यांना संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील मतदारांवर प्रभाव पडेल, अशी कृती किंवा घोषणा करता येणार नाही. या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर दि. 27 एप्रिलपर्यंत प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिध्द केल्या जाणार आहेत. 

 

Tags : satara, satara news, Gram Panchayat, Election,