Sun, Mar 24, 2019 12:30होमपेज › Satara › ट्रॅव्हल्समधून २१ तोळे दागिने लंपास

ट्रॅव्हल्समधून २१ तोळे दागिने लंपास

Published On: Apr 08 2018 2:19AM | Last Updated: Apr 07 2018 11:10PMभुईंज : वार्ताहर

सुरुर, ता. वाई गावच्या हद्दीत महामार्गालगत असलेल्या हॉटेल पार्क इनच्या पार्किंगमधील ट्रॅव्हल्समधून अज्ञात चोरट्यांनी प्रवासी महिलेची तब्बल 21 तोळे वजनाच्या सोन्याच्या ऐवजाची बॅग चोरून नेल्याने खळबळ उडाली. 3 लाख 51 हजार रुपयांचे दागिने असल्याचे तक्रारीत म्हटले असून तक्रारदार महिला बंगळूर येथील आहे. दरम्यान, संशयित चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला असून तो एका कारमधून पुण्याच्या दिशेने पसार झाल्याचे दिसत आहे. सौ.पूजा संकेत शेट (वय 29, रा.राममूर्ती नगर, बंगळूर) यांनी तक्रार दिली आहे. याबाबत भुईंज पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, दि. 6 रोजी सकाळी तक्रारदार पूजा शेट या आनंद ट्रॅव्हल्समधून  (क्र. एमएच 04 जीपी 0185) बंगळूरहून मुंबईकडे निघाल्या होत्या. त्यांच्यासोबत पती व मुले होती. मुंबई हे त्यांचे माहेर असून बॅगेमध्ये इतर साहित्यासह सुमारे 21 तोळे वजनाचे सोन्याचे दागिनेही सोबत घेतले होते. शनिवारी दि. 7 रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास सुरुर गावच्या हद्दीतील हॉटेल पार्क इन येथे ट्रॅव्हल्स चहा, नाष्ट्यासाठी थांबली.

तक्रारदार पूजा आपल्या कुटुंबियासह ट्रॅव्हल्समधून खाली उतरल्या व नाष्टा, चहा झाल्यानंतर पुन्हा ट्रॅव्हल्समध्ये बसल्या. यावेळी दागिन्यांची बॅग त्यांना दिसली नाही. सोन्याची बॅग दिसत नसल्याने त्यांनी सर्व प्रवाशांकडे बॅगेबाबत विचारणा केली. मात्र, बॅग सापडली नाही. दागिन्याची बॅग चोरी झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. तक्रारदार यांनी भुईंज पोलिस ठाण्यात धाव घेतल्यानंतर घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून परिसरासह सीसीटीव्ही तपासले असता त्यामध्ये एक संशयित व्यक्‍ती ट्रॅव्हल्समधून बॅग घेवून कारमध्ये बसून पुणेच्या दिशेने गेल्याचे दिसले.  बॅगेमधील सोन्याचा छोटा हार, सोन्याचे कडे, दोन बांगड्या, सोन्याची चेन, अंगठ्या, कर्णफुले असा 21 तोळे वजनाचा ऐवज चोरी झाला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
 

Tags : satara, satara news, 21 tole jewelry,  theft, Travels,