Tue, Jul 07, 2020 23:45होमपेज › Satara › ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’च्या २१ केसेस

‘ड्रंक अँड ड्राईव्ह’च्या २१ केसेस

Published On: Jan 02 2018 1:15AM | Last Updated: Jan 01 2018 10:44PM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी

नववर्षाच्या पूर्वसंध्येला थर्टी फर्स्टच्या पार्श्‍वभूमीवर रविवारी रात्री सातारा शहरासह परिसरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. ड्रंक अँड ड्राईव्हसह वाहतुकीस अडथळा होईल, अशा पद्धतीने वाहने चालवल्याप्रकरणी एकूण 21 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, पालवी चौकात काही काळ गोंधळ झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी काही अतिउत्साही तरुण मद्यप्राशन करून वाहने चालवतात व त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न ऐरणीवर येऊ नये, यासाठी जिल्ह्यामध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सातारा शहर, शाहूपुरी, तालुका व बोरगाव पोलिसांनी यासाठी हद्दीतील परिसर व महामार्गावर चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. रविवारी रात्री 9 वाजल्यापासूनच पोलिसांचा चौकाचौकांत व ठिकठिकाणी बंदोबस्त होता. पोलिस चारचाकी, दुचाकी वाहनांतून गस्त घालत होते. जल्‍लोषासाठी युवकांचे जथ्थेही वाहनांतून ठिकठिकाणी जात होते. वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी वाहतूक पोलिसांकडून बे्रथ अ‍ॅनालायझर मशिन उपलब्ध होते.

पोलिसांनी शहरासह महामार्गावर चारचाकी व दुचाकीस्वारांची तपासणी केली असता, तब्बल 21 जणांनी मद्यप्राशन केले असल्याचे समोर आले. यामध्ये सर्वाधिक 12 केसेस शहर पोलिसांनी, 7 शाहूपुरी, तर 2 तालुका पोलिसांनी केसेस दाखल केल्या आहेत. दरम्यान, रविवारी रात्री गोडोली नाका येथे पैशाच्या वादातून दोन युवकांमध्ये वादावादी होऊन हाणामारीची घटना घडली. यामुळे गोडोली नाक्यावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, मारहाणीच्या घटनेनंतर तो वाद शहर पोलिस ठाण्यापर्यंत आला. याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.