Thu, Apr 25, 2019 11:49होमपेज › Satara › देऊर सोसायटीमध्ये २ कोटींचा गैरव्यवहार

देऊर सोसायटीमध्ये २ कोटींचा गैरव्यवहार

Published On: Feb 18 2018 2:03AM | Last Updated: Feb 17 2018 10:47PMपिंपोडे बुद्रुक : वार्ताहर 

देऊर (ता. कोरेगाव) येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीत एकूण 2 कोटी 16 लाख 15 हजार 870 रुपयांचा गैरव्यवहार झाला असून, या प्रकरणी तत्कालीन सचिव, तत्कालीन व विद्यमान संचालक मंडळ, तत्कालीन तीन बँक विकास अधिकारी, एक शाखा प्रमुख व तीन वैधानिक लेखापरीक्षक, अशा 36 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

फेरलेखापरीक्षक आनंदराव काकासो कणसे यांनी वाठार स्टेशन पोलिस ठाण्यात गैरव्यवहारप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, देऊर विकास सेवा सोसायटीमध्ये 1 एप्रिल 2008 ते 31 मार्च 2013 व 1 एप्रिल 2013 ते 23 ऑक्टोबर 2013, या कालावधीत आर्थिक गैरव्यवहार झाला होता.त्याचे फेरलेखापरीक्षण करण्यासाठी आनंदराव काकासो कणसे, प्रमाणित लेखा परीक्षक सहकारी संस्था कोरेगाव यांची फेरलेखापरीक्षक म्हणून सातारा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी नेमणूक केली होती. कणसे यांनी या कालावधीत झालेल्या व्यवहारांची तपासणी केली असता त्यांना गैरव्यवहार आढळून आला.

त्यामध्ये कणसे यांनी तत्कालीन सचिव विजय कोकणे यास आवश्यक माहिती व खुलासा मागितला असता त्याने कोणतेही सहकार्य केले नाही व खुलासाही दिला नाही. ही बाब विचारात घेऊन व उपलब्ध दप्तर व माहितीवरून फेरलेखापरीक्षण पूर्ण करण्यात आले. त्यामध्ये संस्थेच्या कोणत्याही सेवकास वैद्यनाथन समितीच्या शिफारशीनुसार दप्तर ठेवण्याचे ज्ञान नसल्याचे दिसून आले. कोकणे याने रोजकीर्दमध्ये बरेच व्यवहार खतावलेले नाहीत. संस्थेकडे असलेल्या संगणकामध्ये अनेक व्यवहारांच्या नोंदी करण्यात आल्या नाहीत. दप्तरात खाडाखोड करून अफरातफर केल्याचे दिसून आले. कर्ज खतावणीस बोगस नोंदी, हातावरील रोख शिलकेमध्ये, अनामत दुबार रोख नावे, अनामत जमा नसताना रोख नावे, दुबार कर्ज वाटप, लाभांश वाटप, बँक बोगस भरणा, निरंक दाखले देऊन बोगस जमा पावत्या काढणे अशा त्रुटी आढळून आल्या आहेत.

फेरलेखापरीक्षण कालावधीत तत्कालीन सचिव, तत्कालीन व विद्यमान संचालक मंडळ, तत्कालीन बँक विकास अधिकारी, वैधानिक लेखापरिक्षक यांनी संगनमताने गैरव्यवहार, गैरकारभार करून अफरातफर केल्याचे दिसून येते. बँक विकास अधिकार्‍यांनी या कालावधीत तपासणी केलेली नाही. सभासदांना पहिले कर्ज असताना दुसरे कर्ज देण्यात आले आहे. त्याकडे विकास अधिकार्‍यांनी लक्ष दिले नाही.अथवा बँक प्रशासनास तसे कळविले नाही.त्यामुळे विकास अधिकारी यास जबाबदार आहेत. प्रत्येक आर्थिक वर्षात वैधानिक लेखापरीक्षण झाले आहे. मात्र लेखापरिक्षकानी ही याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांनाही या गैरव्यवहारात जबाबदार धरण्यात आले आहे.

गैरव्यवहारात जबाबदार असणार्‍या 36 जणांविरुद्ध कणसे यांनी फिर्याद दाखल केली असून त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. त्यामध्ये तत्कालिन सचिव विजय कोकणे, तत्कालिन चेअरमन वसंत कदम, तत्कालिन व्हा. चेअरमन नारायण देशमुख, तत्कालिन संचालक दिलिप काकडे, तत्कालिन संचालक दत्तू कदम, तत्कालिन संचालक प्रमोद कदम, तत्कालिन संचालक माधव भोईटे, तत्कालिन संचालक विठ्ठल पोळ, तत्कालिन संचालक कासम मुजावर, तत्कालिन संचालक दादा कदम, तत्कालिन संचालक सौ. शांताबाई कदम, तत्कालिन संचालक जगन्नाथ कदम, तत्कालिन संचालक नरसिंग कदम, तत्कालिन संचालक विश्‍वनाथ थोरात, तत्कालिन संचालक तुकाराम करपे, तत्कालिन संचालक मधुकर लांडगे,  विद्यमान चेअरमन निलेश देशमुख, विद्यमान व्हा. चेअरमन अनिल कदम, विद्यमान संचालक चेतसिंग कदम, मधुकर कदम, जर्नादन कदम, बाळासो कदम, सुनिल चव्हाण, विलास राजे, मंदाकिनी कदम, दत्तात्रय पवार, विठ्ठल गायकवाड, नारायण लांडगे, संजय कदम, तत्कालिन विकास अधिकारी वाय.आर. देशमुख, तत्कालिन विकास अधिकारी डी.एन. बर्गे , तत्कालिन विकास अधिकारी ए.जी. माने, तत्कालिन शाखा प्रमुख सी.डी. जाधव, वैधानिक लेखा परिक्षक सौ स्मिता शिंदे, वैधानिक लेखा परिक्षक सौ. ज्योती सावंत, विनोद साबळे यांचा समावेश आहे.