होमपेज › Satara › सातार्‍यात चोरीच्या 19 सायकली जप्‍त

सातार्‍यात चोरीच्या 19 सायकली जप्‍त

Published On: Jun 26 2018 1:16AM | Last Updated: Jun 25 2018 11:05PMसातारा : प्रतिनिधी

सातारा शहर परिसरातून महागड्या तब्बल 19 सायकली चोरुन त्या अवघ्या 500 ते 1000 रुपयांपर्यंत विकणार्‍या चोरट्याच्या मुसक्या शहर पोलिसांनी आवळल्या. जप्‍त केलेल्या सायकली शहर पोलिस ठाण्यासमोर लावण्यात आल्या असून तक्रारदारांनी याबाबत तक्रारी देण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, सायकल फेम चोराला मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

मंतोष मिरंग सिंग (वय 21, सध्या रा. धनगरवाडी ता. सातारा मूळ रा. बिहार) असे अटक केलेल्या संशयित युवकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, शहर पोलिस ठाण्यातील पोलिसांना मंतोष सिंग हा संशयित फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. अधिक चौकशीला सुरुवात केल्यानंतर त्याने सायकली चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी अधिक बोलते केल्यावर त्याने सायकलींचा खजिनाच दिला. मंतोष याने राजवाडा, मोती चौक, पोवई नाका, एसटी स्टँड परिसरासह सातार्‍यातील ठिकठिकाणावरुन सायकली चोर्‍या केल्या आहेत. गेल्या पाच ते सहा महिन्यांमध्ये या सायकली चोरल्या असल्याची माहिती समोर आली आहे. अद्याप तरी त्याचा एकट्याचा समावेश असून कसून चौकशी सुरुच आहे. चोरी केलेल्या काही सायकलींच्या किंमती 10 ते 15 हजार रुपयांपर्यंत आहेत. यामुळे जप्‍त केलेल्या सायकलींची एकूण किंमत सुमारे 1 लाख रुपयांपर्यंत आहे.

दरम्यान,  सातार्‍यातून ज्यांच्या सायकली चोरी झालेल्या आहेत त्यांनी शहर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. पोनि नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार नानासाहेब कदम, सहाय्यक फौजदार डी.वाय.कदम, पोलिस हवालदार गुलाब जाधव, अनिल स्वामी, अविनाश चव्हाण, पंकज ढाणे, शेवाळे यांनी कारवाईत सहभाग घेतला.