Fri, Jul 19, 2019 00:55होमपेज › Satara › सातारा : नीरा उजवा कालव्यात तरुणी वाहून गेली

सातारा : नीरा उजवा कालव्यात तरुणी वाहून गेली

Published On: Apr 21 2018 12:01PM | Last Updated: Apr 21 2018 10:18PMफलटण : प्रतिनिधी

मामाच्या गावाला सुट्टीसाठी आलेली 18 वर्षीय युवती नीरा उजवा कालव्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना निंबळक, ता. फलटण येथे शनिवारी घडली. मामाच्या डोळ्यादेखत ही घटना घडली असून, या युवतीचा स्थानिक ग्रामस्थ व युवकांनी शोध घेण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. मात्र, त्यामध्ये अपयश आले. प्रियांका सुनील घोडके  (वय 18, रा. रुई, ता. बारामती) असे वाहून गेलेल्या युवतीचे नाव आहे. 

याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यातून  मिळालेली  अधिक माहिती अशी, प्रियांका शुक्रवारी निंबळक येथे तिचे मामा विक्रम लालासो भोसले यांच्याकडे  आली होती. सकाळी मामासोबत ती निरा उजवा कालव्यावर गेली होती. तिचे मामा पोहत पोहत पलीकडच्या काठावर गेले. त्यावेळी प्रियांका हात-पाय धुण्यासाठी कालव्याकडे गेली.  त्यावेळी तिचा पाय घसरून ती पाण्यात पडली.

पलिकडच्या काठावरुन मामाने हे दृश्य पाहिले. त्यांनी तातडीने प्रियांकाच्या बचावासाठी झेप घेतली. मात्र, काही समजण्याच्या आतच पाण्याच्या प्रवाहात ती वाहून गेली. मामाने काही ग्रामस्थ व युवकांच्या साथीने प्रियांकाचा कालव्याच्या पाण्यात शोध घेण्याचा प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरु होता. या घटनेची नोंद ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

Tags :  Girl Drawn Away,  Neera canal, Satara, Phaltan, Young Girl