Wed, Jul 17, 2019 08:33होमपेज › Satara › शासनाकडून १६ टक्के आरक्षणाचे गाजर

शासनाकडून १६ टक्के आरक्षणाचे गाजर

Published On: Aug 02 2018 2:01AM | Last Updated: Aug 01 2018 10:18PMपाटण : प्रतिनिधी

मराठा आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रात वाढत असलेल्या सरकार विरोधी असंतोषाच्या  पार्श्‍वभूमीवर सरकारने मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याची तयारी दाखवली आहे. तसे पाहता 16 टक्के आरक्षण मराठा समाजाची लोकसंख्या पाहता अल्प आहे. ते वाढवून द्यावे यासह अन्य मागण्यांचे निवेदन  मराठा क्रांती मोर्चा पाटण तालुक्याच्या वतीने राज्य शासनाला पाठविण्यात आले आहे. 

निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाने काढलेल्या 72 हजार मेगा नोकर भरतीत 16 टक्के प्रमाणे विचार केला तर केवळ 11 हजार 520 जागा मराठा समाजाला मिळणार आहेत. तर 60 हजार 480 जागांवर अल्पसंख्याक इतर समाजांचा अधिकार राहणार. मग मेगा भरतीचा विचार केला तर 16 टक्के आरक्षण मराठा समाजाला पुरेसे आहे का? त्यामुळे मराठा आरक्षण राज्यातील लोकसंख्येच्या निकषांवर 16 टक्के पेक्षा जास्त वाढवून मिळावे. 

महाराष्ट्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे सर्वात जास्त लोकसंख्येने असलेल्या मराठा समाजावर नेहमीच अन्याय होत आलेला आहे. शैक्षणिक असो अथवा शासकीय नोकर भरती आरक्षणाचे भूत मराठा समाजाच्या मानगुटीवर बसवून समाजाला सरकारने शासकीय सवलती व  नोकर भरतीत अल्पसंख्याक आणि मागास केले आहे. याचा फटका समाजातील हुशार व होतकरू विद्यार्थी- विद्यार्थिनींना, बसत आहे. यामुळे समाजात मागासलेपण वाढून यात अनेकांना नैराश्य आले आहे. सरकारने मराठा समाजाला देऊ केलेले 16 टक्के आरक्षण  महाराष्ट्र राज्यातील मराठा समाजाची लोकसंख्या पाहता अल्प आहे. हे 16 टक्के आरक्षण कोणाच्या वाट्याला येणार? 

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी राज्यभर चाललेल्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर बुधवार दि. 25 रोजी नवी मुंबई येथे झालेल्या आंदोलनावेळी खोणोली (ता. पाटण) येथील रोहन तोडकर या युवकाचे बलिदान गेले. त्याच वेळी मुंबई येथे मोल-मजूरी करणारे नाटोशी (ता. पाटण) येथील नागरीक व्यंकट काटकर हे गंभीर जखमी झाले. यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक सहाय्य मिळावे आणि आंदोलना दरम्यान पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत,असे निवेदनात म्हटले आहे. 

मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाची दखल शासनाने घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय तात्काळ जाहीर करावा. मराठा युवकांच्या सहनशिलतेचा अंत पाहू  नये, असेही मराठा क्रांती मोर्चाने म्हटले आहे.