Thu, Jun 27, 2019 13:42होमपेज › Satara › हॉटेलमध्ये अंघोळीसाठी गेलेल्या मुलाचा भाजून मृत्यू

हॉटेलमध्ये अंघोळीसाठी गेलेल्या मुलाचा भाजून मृत्यू

Published On: May 05 2018 5:18PM | Last Updated: May 05 2018 5:18PMमहाबळेश्‍वर : वार्ताहर

कुटुंबीयांसोबत महाबळेश्‍वर येथे  फिरायला आलेल्या एका 15 वर्षीय शाळकरी मुलाचा हॉटेलमध्ये अंघोळीला गेल्यानंतर गरम पाण्याने भाजून मृत्यू झाल्याची धक्‍कादायक घटना शनिवारी दुपारी घडली. 

हमजा जावेद मानकिया (वय 15, रा. पायधुनी, मुंबई) असे या मुलाचे नाव आहे. महंमद उकाजी वाडीया (वय 61, रा. कोळसा मोहल्ला, मुंबई) हे शुक्रवारी कुटूंबियांसह महाबळेश्‍वरला पर्यटनास आले होते. त्यांनी नातेवाईकांची खोली 6 दिवसांसाठी घेतली होती. शनिवारी सकाळी आंघोळीला जाण्यापूर्वी हमजा याने बाथरूममधील गॅस गिझर सुरु केला व काही वेळानंतर तो आंघोळीसाठी गेला. मात्र, तो अर्धा ते पाऊण तास बाथरूममधून बाहेर आला नाही. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी त्याला हाक मारली. परंतु, आतून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर त्याच्या वडिलांनी बाथरूमचा दरवाजा तोडला असता हमजा खाली पडलेला दिसला. यावेळी हमजाच्या डाव्या बाजूच्या खांद्याला व पाठीला भाजले होते. यानंतर त्याला ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. 

मृतदेहाचे शवविच्छेदन केले असता अहवालात ‘शॉक ड्यु टू बर्न’ असे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, हमजा हा गुजरातमधील नवसारी जि. सुरत येथे शिक्षणासाठी आहे. रमजानमित्त शाळेला सुट्टी असल्याने तो मुंबईत आला होता. त्यानंतर आजी-आजोबांबरोबर तो महाबळेश्‍वर येथे पर्यटनासाठी आला होता. त्याच्या या अचानक मृत्यूमुळे सर्वांनाच जबर धक्‍का बसला आहे. तपास हवालदार श्रीकांत कांबळे, चंद्रकांत तिटकारे करत आहेत.