Thu, Aug 22, 2019 14:51होमपेज › Satara › जनावरांची तहान अवघ्या १५ लि. पाण्यावर

जनावरांची तहान अवघ्या १५ लि. पाण्यावर

Published On: May 16 2019 2:13AM | Last Updated: May 16 2019 2:13AM
सातारा : प्रविण शिंगटे

माण-खटाव तालुक्यांत दुष्काळाने हाहाकार माजवला असून पाण्याच्या एकेका थेंबासाठी जनता कासावीस झाली आहे. ‘पाणी जगायपुरतंही नाय.. अन् मरायपुरतंही नाय,’ असा टाहो जनता फोडत आहे. जनावरांची अवस्था तर त्याहूनही बिकट आहे. एका मोठ्या जनावराला दिवसाकाठी फक्‍त 40 लिटर पाणी, तर लहान जनावराला अवघे 10 ते 15 लिटर पाणी प्रशासनामार्फत दिले जात आहे. प्रत्यक्षात साधारणत: एक जर्सी गाय सुमारे 70 लिटर पाणी एकावेळी पित असून दिवसाकाठी तिला किमान 150 लिटर तरी पाणी लागते. ही अशीच तफावत अन्य जनावरांच्या पाण्याबाबतही असल्याने छावणीतील जनावरे तडफडू लागली आहेत. 

माण, खटाव, कोरेगाव, फलटण, खंडाळा, वाई, पाटण, जावली, महाबळेश्‍वर, सातारा व कराड तालुक्यांतील 207 गावे व 861 वाड्यावस्त्यांमधील 3 लाख 46 हजार 576 नागरिकांना  व 1 लाख 70  हजार 250 जनावरांची तहान टँकरवर असून जिल्ह्यात टँकरने द्विशतक गाठले  आहे. माणमध्ये भाटकी, भालवडी, अनभुलेवाडी, जाधववाडी, बिजवडी, मोगराळे,  वरकुटे-म्हसवड, आंधळी,  पाचवड, 
शेणवडी, वडगाव, इंजबाव, पांगरी,  येळेवाडी, राजवडी, बोराटवाडी, जांभूळणी, दानवलेवाडी, म्हसवड अशा 25 ठिकाणी चारा छावण्या सुरु आहेत. छावणीत दररोज मोठ्या जनावरास 18 किलो चारा व 35 ते 40 लिटर पाणी तसेच लहान जनावरास साडेसात किलो चारा व 10 ते 15 लिटर  पाणी दिले जात आहे. मात्र दररोज तीव्र उन्हाचा तडाखा बसत असल्याने जनावरांचे पाणी पिण्याचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे मोठ्या जनावराला एकावेळी सुमारे 20 लिटरहून अधिक पाणी पिण्यासाठी लागते. त्यामुळे 40 लिटर पाण्यावर जनावरांची तहान भागत नाही तसेच लहान जनावरांचीही तहान 10 लिटर पाण्यावर भागत नाही त्यामुळे जनावरांनाही पुरेशा प्रमाणात दोन वेळा पाणी द्यावे अशी मागणी छावणीतील शेतकर्‍यांनी केली आहे. तसेच ओला चारा म्हणून बहुतांश ठिकाणी जनावरांना उस दिला जात आहे. या उसाच्या चार्‍यांमुळे जनावरांच्या तोंडांना जखमा होत आहेत.

उष्णतेच्या प्रचंड लाटेमुळे बहुतांश धरणे, तलाव, नदीनाले, विहिरी, विंधन विहिरी कोरड्या ठाक पडल्या आहेत. त्यामुळे दुष्काळी भागातील पाण्याचे स्त्रोत पुर्णत: आटले आहेत. अनेक गावेच्या  गावे तहानली आहेत. पाण्यासाठी अनेकांनी गावामधून स्थलांतर सुरू केले आहे. काही नागरिकांनी आपली जनावरे विकली आहेत. 

गेल्या काही वर्षापासून पावसाने पाठ फिरवल्याने जमिनीमध्ये काहीही पिकले नाही, अशा शेतकर्यांनी जगायचे कसे असा प्रश्‍नही निर्माण झाला आहे.त्यामुळे या शेतकरी व नागरिकांसाठीही शासनाने अन्नधान्याच्या रूपात काहीतरी मदत करावी, अशी अपेक्षा दुष्काळी जनतेकडून व्यक्‍त होत आहे. 

शेळया-मेंढ्या जगवायच्या तरी कशा? 

शेळ्या मेंढ्यासाठी ओसाड माळरानावर वाळलेलं कुसळाचे गवत शिल्लक राहिले आहे. मात्र त्यालाही शेळ्या-मेंढ्या साधे तोंडसुध्दा लावत नाहीत.तसेच झाडंही वाळलेली आहेत. त्यामुळे सुकलेल्या फांद्यामुळे ही झाडे बोडकी दिसू लागली आहेत. त्यामुळे या शेळया मेंढ्या जगवायच्या कशा? असा प्रश्‍न सतावू लागला आहे. सावलीसाठी कुठेही झाडे दिसत नाहीत. मैलो न मैल माळरानं ओसाड असल्याचे चित्र ठिकठिकाणी पहावयास मिळत आहे.त्यामुळे रानोमाळात एक चिटपाखरूही दिसत नसल्याचे भयावह चित्र माण, खटावमध्ये दिसत आहे.