होमपेज › Satara › रिमांड होममधील 15 मुलांना उलट्या-जुलाबाचा त्रास 

रिमांड होममधील 15 मुलांना उलट्या-जुलाबाचा त्रास 

Published On: Aug 29 2018 1:44AM | Last Updated: Aug 28 2018 11:16PMकराड : प्रतिनिधी 

येथील रिमांड होममधील पंधरा मुलांना उलट्या व जुलाबाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती चांगली असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. याबाबत अधिक माहिती अशी की, येथील क्रांतिवीर महादेवराव जाधव बालसुधार केंद्रातील (रिमांड होम) मुलांना सोमवारी (दि. 27) अचानक उलट्या व जुलाबाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे रिमांड होममधील कर्मचार्‍यांनी मुलांना उपचारासाठी वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी दोन मुलांना रुग्णालयात सलाईन लावली. तर इतरांवर प्राथमिक उपचार करून त्यांना गोळ्या व औषधे दिली. 

मात्र, दुसर्‍या दिवशी मंगळवार दिनांक 28 पर्यंत मुलांमध्ये अपेक्षित सुधारणा न झाल्याने रिमांड होममधील कर्मचार्‍यांनी त्रास होणार्‍या सर्व मुलांना कृष्णा हॉस्पिटलमध्ये हलवले. मंगळवारी सकाळी काही मुलांना तर सायंकाळी काही मुलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असून सर्व मुलांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. 

दरम्यान, रक्षाबंधन निमित्त रिमांड होममध्ये मुलांचे नातेवाईक व सामाजिक कार्यकर्ते यांनी त्यांची भेट घेऊन काही खाऊ दिले. तसेच इतरही पदार्थ मुलांनी खाल्ले असावेत. त्यामुळे त्यांना उलट्या व जुलाबचा त्रास झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वैद्यकीय सूत्रांनी व्यक्त केला आहे. सर्व मुलांची प्रकृती चांगली असून त्यांच्यावर जनरल वॉर्डमध्ये उपचार सुरू असल्याचेही वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.