होमपेज › Satara › वस्ती साकुर्डीमध्ये १४४ जणांना गॅस्ट्रोसद‍ृश लागण

वस्ती साकुर्डीमध्ये १४४ जणांना गॅस्ट्रोसद‍ृश लागण

Published On: May 14 2018 1:40AM | Last Updated: May 13 2018 11:33PMकराड : प्रतिनिधी 

अशुद्ध पाण्यामुळे तब्बल 144 जणांना गॅस्ट्रोसद‍ृश साथीची लागण झाल्याची धक्‍कादायक घटना वस्ती साकुर्डी (ता. कराड) येथे घडली. या सर्वांवर सातारा व कराडच्या शासकीय रुग्णालयांसह कराडमधील काही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, गावात 117 जणांवर प्राथमिक उपचार करण्यात आले असून, गावचा पाणीपुरवठाही बंद ठेवण्यात आला आहे. 

वस्ती साकुर्डी येथे शनिवारी रात्रीपासून ग्रामस्थांना उलट्या तसेच जुलाबाचा त्रास सुरू झाला. काही तासांतच उलट्या व जुलाब होणार्‍या ग्रामस्थांची संख्या 100 हून अधिक झाल्याने घटनेचे गांभिर्य लक्षात घेत प्रशासकीय अधिकार्‍यांसह तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिल कोरबू यांच्यासह त्यांचे सहकारी गावात पोहचले. ज्या ग्रामस्थांना उलट्या व जुलाबाचा त्रास कमी होता, अशा 117 ग्रामस्थांवर ग्रामपंचायत कार्यालयात उभारण्यात आलेल्या कक्षात उपचार करण्यात आले.

तर जास्त त्रास होत असलेल्या 144 रूग्णांना सातारा व कराड येथील शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कराड येथील रूग्णालयात बेड संख्याही अपुरी पडल्याचे पहावयास मिळाले. सध्यस्थितीत कराडच्या सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात 27 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी दोघांना पुढील उपचारासाठी सातारा येथे हलवण्यात आले आहे. याशिवाय मलकापूर (ता. कराड) येथील कृष्णा हॉस्पिटलसह कराडमधील काही खाजगी रूग्णालयातही ग्रामस्थांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळेच ग्रामस्थांना गॅस्ट्रोसद‍ृश्य आजार झाल्याचे समोर आले आहे. पाणी पुरवठ्याच्या मुख्य लाईनला चार ते पाच ठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळेच या ठिकाणाहून अशुद्ध पाणी पुरवठा झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. तसेच काही ग्रामस्थ लग्न समारंभासाठी बाहेरगावी गेले होते. त्यामुळे याठिकाणी अशुद्ध पाण्यामुळे ग्रामस्थांना गॅस्ट्रोसद‍ृश्य आजार झाला आहे का? याचीही चाचपणी वैद्यकीय विभागाकडून सुरू आहे. गावचा पाणी पुरवठा बंद ठेऊन मुख्य पाईप लाईनची गळती काढण्याचे काम सुरू आहे. ग्रामस्थांनी उकळून पाणी पिण्याचे आवाहन करण्यात आले असून घरोघरी मेडिक्लोअरचेही वाटप करण्यात आले आहे.