Tue, Jul 23, 2019 07:03होमपेज › Satara › जिल्ह्यातील 14 हुतात्मा स्मारकांना झळाळी 

जिल्ह्यातील 14 हुतात्मा स्मारकांना झळाळी 

Published On: Aug 15 2018 1:26AM | Last Updated: Aug 15 2018 12:24AMसातारा : आदेश खताळ

स्मारक म्हणजे एखाद्या घटनेची किंवा व्यक्‍तीची आठवण म्हणून उभारलेला स्तंभ, वास्तू असते. अशा स्मारकांपासून भावी पिढीला एक प्रेरणा तर मिळतेच; पण आदर्शही डोळ्यांसमोर राहतो. त्या व्यक्‍तीचे कार्य चिरंतन राहावे म्हणूनही अशी स्मारके उभारली जातात. जिल्ह्याला जाज्वल्य इतिहासाची परंपरा असून देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून अनेकांनी प्राणांचे बलिदान दिले. हौतात्म्य पत्कारणार्‍या व्यक्‍तींचे कार्य सांगणार्‍या जिल्ह्यातील 14 हुतात्मा स्मारकांना जिल्हा प्रशासनाने झळाळी दिली असून या स्मारकांचे स्वातंत्र्यदिनी लोकार्पण केले जाणार आहे.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सातार्‍याचे योगदान मोठे आहे. क्रांतीचा जिल्हा म्हणून सातार्‍याची देशभरात ओळख आहे. जिल्ह्याचा लढाऊबाणा सैनिकांचा जिल्हा म्हणूनही देश पाहत आहे. इंग्रजांच्या गुलामगिरीतून देश मुक्‍त व्हावा, यासाठी अनेकांनी हौतात्म्य पत्करले. या शूरवीरांच्या आठवणी चिरंतन स्मरणात ठेवण्यासाठी जिल्ह्यात हुतात्मा स्मारकांची निर्मिती झाली. हौतात्म्य पत्करणार्‍या शूरवीरांचे कार्य लोकासमोर यावे, तरुणाईपुढे त्यांचा आदर्श उभा करण्यासाठी राज्य शासनाने जिल्ह्यातील 14 हुतात्मा स्मारकांचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला. एकाच वेळी एवढ्या संख्येने स्मारकांचेनुतनीकरण झाल्याने सातारा जिल्हा राज्यात पहिला ठरला आहे.

सातारा शहरात मध्यवर्ती ठिकाणी ‘चारभिंती’ हे एक हुतात्मा स्मारक आहे. छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी 1830 साली या ठिकाणाची निर्मिती केली. पूर्वीपासून मराठ्यांची राजधानी असल्यामुळे विजयादशमीच्या दिवशी मिरवणूक काढली जाते. ही मिरवणूक राजघराण्यातील स्त्रियांना  पाहता यावी म्हणून  ‘चार भिंती’ची निर्मिती झाली. या ठिकाणाला ‘नजर महाल’ म्हणून पण संबोधले जायचे. त्यानंतर 1857 च्या स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ येथे स्मारकाची उभारणी झाली. इंग्रजांच्या विरुद्ध पहिल्या स्वातंत्र्य संग्रामाच्या 100 वर्षपूर्तीला याचे बांधकाम करण्यात आले.

सातारा शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस चौकातही हुतात्मा स्मारक आहे. या स्मारकाचे काम 1985-1986 साली झाले. स्मारकाची देखभाल दुरुस्ती सातारा नगरपालिका करत आहे. या स्मारकाचा लूक बदलून गेला आहे. याशिवाय देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत जावली तालुक्याचे काम मोठे आहे. तालुक्यातील बामणोली तर्फ कुडाळ येथील हुतात्मा स्मारकाचे काम 1982 साली करण्यात आले.या  स्मारकाची व्यवस्था जावली पंचायत समिती करत आहे. कोरेगाव तालुक्यात स्वातंत्र्य संग्रामाचा झंझावात होता. त्यामुळे याठिकाणी सातारा-पंढरपूर मार्गावर आझाद चौकाजवळ 1980-1981 रोजी हुतात्मा स्मारकाचे काम करण्यात आले. कराड तालुक्यातील अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्य चवळीत भाग घेतला होता. याठिकाणी शास्त्रीनगर-मलकापूर दरम्यान 1982 रोजी हुतात्का स्मारक बांधण्यात आले. त्याची जबाबदारी कराड नगरपालिकेकडे आहे. याच तालुक्यात दुशेरे तसेच इंदोली याही ठिकाणी हुतात्का स्मारकांचे बांधकाम 1982 रोजी करण्यात आले. त्याची देखभाल सार्वजनिक बांधकाम विभाग करत आहे.

स्वातंत्र लढ्यामध्ये खटाव तालुक्याचे मोठे योगदान आहे. त्याच्या खुणा तालुक्यात ठिकठिकाणी पहायला मिळतात. या तालुक्यात सर्वाधिक सहा हुतात्मा स्मारकांची निर्मिती करण्यात आली. वर्धनगड (1984), पुसेसावळी (1984-1985), वडगाव जयराम स्वामी (1984-1985), उंची ठाणे (1984-1985) या ठिकाणी असलेल्या या स्मारकांना नवा लूक मिळाला आहे. या स्मारकांची देखभाल खटाव पंचायत समिती करत आहे. वाई तालुक्यातील अनेक दिग्गजांनी सातंत्र्य चळवळीत भाग घेवून तो काळ गाजवला.  कणूर तसेच सोनगिरवाडी येथे 1982 साली हुतात्मा स्मारके बांधण्यात आली आहेत. शासनाने स्मारकांच्या दुरुस्तीसाठी सुमारे 2 कोटी 37 लाखांचा निधी उपलब्ध करुन दिला. जिल्ह्यातील संबंधित स्मारकांच्या नुतनीकरणाचे काम नुकतेच पूर्ण झाले असून या स्मारकांनी कात टाकली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला हुतात्मा स्मारके नटून गेली आहेत.  जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निवासी उपजिल्हाधिकारी  सचिन बारकवर यांनी संबंधित विभागांच्याकडे पाठपुरावा केल्याने हे काम वेळेत मार्गी लागले.