होमपेज › Satara › जिल्ह्यातील १३ संशयित तडीपार

जिल्ह्यातील १३ संशयित तडीपार

Published On: Mar 19 2018 1:49AM | Last Updated: Mar 19 2018 1:16AMसातारा : प्रतिनिधी

जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडून तडीपारीची धडक मोहीम सुरूच असून रविवारी सातारा जिल्ह्यातील विविध तीन टोळ्यांतील 13 जणांना तडीपार करण्यात आले. यामध्ये भुईंज पोलिस ठाणे, वाठार पोलिस ठाणे व फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संशयितांचा समावेश आहेे. मटका किंग, मारामारी व चोरी प्रकरणातील हे सर्व संशयित आहेत. दरम्यान, पोलिस अधीक्षकांच्या या कारवाईने गुंडांनी धसका घेतला आहे.

भुईंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत मटका जुगार चालवणार्‍या 7 जणांना तडीपार करण्यात आले आहे. यामध्ये विनोद सावकार धोत्रे (वय 38, रा. पाचवड), मारुती शिवाजी भिंगारे (वय 39, रा. पाचवड), अमोल सखाराम जाधव (वय 22, रा. विराटनगर, अमृतवाडी), रमेश पांडुरंग गायकवाड (वय 55, रा. पाचवड), सूर्यकांत सदाशिव बांदल (वय 42, पाचवड), सतोष गुलाबराव निकम (वय 43, रा. अमृतवाडी), राहुल रामदास गाडगीळ (वय 30, रा. अमृतवाडी, सर्व ता. वाई) यांना तडीपार केले आहे. संशयित सर्वांना सातारा, जावली, वाई, खंडाळा, कोरेगाव, महाबळेश्‍वर या सहा तालुक्यांतून 6 महिन्यांसाठी तडीपार केले आहे.

वाठार पोलिस ठाण्याच्या हद्दीतून गर्दी-मारामारी, खुनाचा प्रयत्न याप्रकरणी नीलेश ज्ञानदेव जाधव (वय 31), अभिजित गोरख जाधव (वय 27) व किरण विलास जाधव (वय 25, सर्व रा. वाठार स्टेशन, ता. कोरेगाव) यांना 1 वर्षाच्या कालावधीसाठी सातारा, कोरेगाव, खटाव, वाई, फलटण, खंडाळा या तालुक्यांतून तडीपार केले आहे. फलटण पोलिस ठाण्याच्या हद्दीतून शेतकर्‍यांची इलेक्ट्रॉनिक मोटर चोरीप्रकरणी अनिल कुमार माकवाडी (वय 28), पृथ्वीराज जयवंत जाधव (वय 27), भरत रघुनाथ जुवेकर (वय 28, सर्व रा. जिंती नाका, ता. फलटण) या सर्वांना 2 वर्षांसाठी संपूर्ण सातारा जिल्हा व पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदर तालुक्यांतूनही तडीपार करण्यात आले आहे.

पोलिसांकडून वेळोवेळी सुधारण्याची संधी

सर्व 13 संशयितांना वेळोवेळी पोलिसांनी सुधारण्याची संधी दिली होती. मात्र, त्यांच्या वर्तनामध्ये सुधारणा होत नव्हती. संशयितांवर कठोर कारवाई करावी, अशी नागरिकांमधून मागणी होत होती. अखेर त्या पोलिस ठाण्याच्या प्रमुखांनी तडीपारीचा प्रस्ताव तयार करून तो जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे सादर केला. अखेर रविवारी संशयित 13 जणांना तडीपार करण्यात आले.