कोरेगाव : प्रतिनिधी
रेवडी सोसायटीचा सचिव दशरथ संपत भोसले (रा. कोलवडी) याने सोसायटीमध्ये 13 लाख 25 हजार 258 रुपयांचा अपहार केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असून, या विषयामध्ये हलगर्जीपणा केल्याबद्दल सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चार विकास अधिकारी, दोन वैधानिक लेखापरीक्षक व संचालक मंडळातील सदस्य अशा एकूण 20 जणांविरोधात कोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविषयी तालुका शासकीय लेखापरीक्षक प्रशांत टकले यांनी तक्रार दाखल केली आहे.
याबाबत पोलिस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, सचिव दशरथ भोसले याच्याकडे रेवडी विकास सेवा सोसायटीचा पदभार होता. त्याने सोसायटीच्या सभासदांनी रोखीने भरणा केलेल्या रकमेची नोंद जमा पावतीप्रमाणे कीर्दीला घेतली नाही, तसेच बेनामी रक्कम खर्ची टाकत 13 लाख 25 हजार 258 रुपयांचा अपहार केला आहे. सोसायटीच्या कामकाजाची जबाबदारी असताना त्यावर व्यवस्थित देखरेख न करता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सातारा रोड शाखेचे विकास अधिकारी सी. डी. जाधव, पी. टी. मुळीक, एस. डी. माने व एस. आर. भोईटे यांनी व्यवस्थित कामकाज केले नाही, तसेच वैधानिक लेखापरीक्षक सतीश पवार व सौ. उषा सतीश पवार यांनी लेखापरीक्षण करत असताना कर्तव्यात कसूर केली आहे.
याबाबत जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) डॉ. महेश कदम यांनी दिलेल्या आदेशानुसार, दि. 14 जून ते 8 ऑगस्ट 2017 अखेर तालुका शासकीय लेखापरिक्षक म्हणून प्रशांत टकले यांनी सोसायटीचे फेरलेखापरीक्षण केले. विद्यमान सचिव कल्याण भोसले यांनी सादर केलेल्या कागदपत्रांवरुन टकले यांना आढळलेल्या त्रुटी, अपहार आदीबाबत सविस्तर फेरलेखापरीक्षण अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात आला होता. वरिष्ठ अधिकार्यांनी दिलेल्या आदेशानुसार टकले यांनी शुक्रवारी रितसर तक्रार दाखल केली.
पोलिसांनी या तक्रारीवरुन सचिव दशरथ भोसले याच्यासह संचालक महेंद्र मोरे, नित्यानंद मोरे, दशरथ मोरे, वसंत मोरे, लक्ष्मण दरेकर, मनोहर लांडगे, किसन आवारे, मारुती कदम, धनसिंग शिंदे, तानाजी पवार, शिवाजी दरेकर, शिवराज म्हेत्रे, भामाबाई पवार, जिल्हा बँकेचे विकास अधिकारी सी. डी. जाधव, पी. टी. मुळीक, एस. डी. माने, एस. आर. भोईटे, वैधानिक लेखापरीक्षक सतीश पवार व उषा पवार यांच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक संभाजी म्हेत्रे व सहाय्यक फौजदार वसंत साबळे तपास करत आहेत.