Mon, May 25, 2020 23:18होमपेज › Satara › ‘उत्पादन शुल्क’कडून १२३ जणांना अटक

‘उत्पादन शुल्क’कडून १२३ जणांना अटक

Last Updated: Oct 09 2019 11:56PM
सातारा : आदेश खताळ
जिल्ह्यात लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या पंधरा दिवसांत उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अनिल चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात धडाकेबाज कारवाया झाल्या. भरारी पथकांनी 123 जणांना अटक करून 23 लाख 54 हजारांचा मुद्देमाल जप्‍त केला आहे.  त्यामध्ये 2 हजार 119 लिटर दारूचा समावेश आहे. या कारवाईने बेकायदा दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. जिल्ह्यात निवडणूक काळात दारूची संशयास्पद विक्री रोखण्यासाठी विविध सुमारे 563 परवानाधारकांवर सीसीटीव्हीचा ‘वॉच’ ठेवण्यात आला आहे.

सातारा लोकसभा पोट निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीत मद्याचे प्रलोभन टाळण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाया सुरू केल्या आहेत. आदर्श आचारसंहिता लागू होताच राज्य उत्पादन शुल्क विभाग पुरता कामाला लागला आहे. निवडणूक काळात दारूचे आमिष दाखवण्याचा  प्रकार थांबविण्यासाठी या विभागाने कंबर कसली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने  विभागीय उपायुक्‍त यशवंत पवार, अधीक्षक अनिल चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली 21 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या दरम्यान    जिल्ह्यात छापासत्र सुरु करुन वाहन तपासणी करत मद्यासह वाहने असा सुमारे 23 लाख 54 हजारांचा ऐवज हस्तगत केला. याप्रकरणी महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अन्वये थेट गुन्हे दाखल करत या विभागाने बेकायदा दारु निर्मिती, विक्री आणि वाहतूक करणार्‍या 123 जणांना जेरबंद केले.  

आचारसंहिता काळात निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये कुठेही गैरप्रकार होणार नाही, यासाठी विशेष काळजी घेतली गेली. त्याबाबत जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनीही सुचना केल्या आहेत. त्यानुसार  जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघासाठी सातारा, कराड, फलटण निरीक्षकांसह चार भरारी पथके स्थापन करण्यात आली असून त्यामध्ये इन्स्पेक्टर, 2 सब इन्स्पेक्टर, 10 कॉन्स्टेबल यांचा समावेश आहे. या पथकांनी  बेकायदा दारुवर  कारवाई केली.  बेकायदा दारु विक्री, संशयास्पद वाहनांची तपासणी करुन  2 हजार 119  लिटर दारु जप्‍त करण्यात आली. त्यामध्ये 385 लिटर हातभट्टी, 735 लिटर देशी-विदेशी दारु, 999 लिटर ताडी यांचा समावेश आहे. या कारवाईत 5 हजार 177 लिटर रसायनही जप्‍त करण्यात आले असून अधिकार्‍यांनी 22 वाहनेही ताब्यात  घेतली.

जिल्ह्याच्या सीमेवरुन हातभट्टीचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा होत असल्याचे कारवाईने स्पष्ट झाले. दारु विक्री परवानाधारकांवर नजर ठेवण्यासाठी अधिकार्‍यांवर जबाबदारी सोपविण्यात आली. पथकांनी 563 दुकानांचे निरीक्षण करायला सुरुवात केली आहे. त्यामध्ये वाईन शॉप, देशी दारु, परमीट रुम, होलसेल विदेशी दारु, देशी दारु होलसेल यांच्यावर सीसीटीव्हीद्वारे ‘वॉच’ ठेवला आहे. निवडणूक काळात आयोगाच्या नियमांचे उल्‍लंघन करणार्‍यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे. ही कारवाई अधीक्षक अनिल चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा निरीक्षक शहाजी पाटील, कराड निरीक्षक आर. एस. पाटील, सातारा भरारी पथक निरीक्षक आ. एस. पुजारी, दुय्यम निरीक्षक संजय शिलेवंत, प्रताप बोडकर, शिरीष जंगम, महेश गायकवाड, बबन पाटील, धनाजी पोवार, सहा. दु. निरीक्षक एस. टी. बावकर, एस. पी. डोईफोडे, नरेंद्र कलकुटगी, किरण जंगम, विक्रम भोसले आदिंनी कारवाईत सहभाग घेतला.