Sat, Apr 20, 2019 18:08होमपेज › Satara › जिल्ह्यातील 122 ग्रा.पं.ची वॉर्ड रचना

जिल्ह्यातील 122 ग्रा.पं.ची वॉर्ड रचना

Published On: Jun 28 2018 1:41AM | Last Updated: Jun 27 2018 11:05PMसातारा : प्रतिनिधी

ऑक्टोबर 2018 ते सप्टेंबर 2019 या कालावधीत मुदत संपणार्‍या तसेच नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 122 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी राबवण्यात येत असलेल्या निवडणूक कार्यक्रमात 9 ऑगस्टला प्रभाग रचना अंतिम केली जाणार आहे.

जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राज्य  निवडणूक आयोगाने वॉर्ड रचना तसेच आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. गावचे नकाशे अंतिम केल्यावर प्रभागाच्या सीमा निश्‍चित करण्यात आल्या आहेत. त्यानंतर 30 रोजी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समिती प्रारूप प्रभाग रचनेला मान्यता देणार असून त्यावर सदस्य सह्या करणार आहेत. विशेष ग्रामसभा बोलावून 7 जुलैला तहसीलदारांनी प्राधिकृत केलेल्या अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली प्रारूप प्रभाग रचनेवर आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे. 11 जुलै रोजी प्रारूप प्रभाग रचना व आरक्षण प्रसिद्ध करण्यापूर्वी तहसील कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालये असे प्रस्ताव तयार करून त्यांची संक्षिप्‍त प्राथमिक तपासणी करून त्यामध्ये दुरुस्त्या केल्या जाणार आहेत. 12 जुलै रोजी दुरुस्त्यांचा समावेश करून प्रारूप प्रभाग रचना व आरक्षणाला तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समितीने मान्यता देऊन सदस्यांची स्वाक्षरी केली जाणार आहे.

त्यानंतर 13 जुलै रोजी प्रारुप प्रभाग रचनेची नोटीस प्रसिध्द करुन तहसीलदार हरकती व सुचना मागवण्यासाठी जाहीर सुचना प्रसिध्द करणार आहेत.  नागरिकांना 20 जुलैपर्यंत सूचना व हरकती दाखल करता येतील.  21 जुलै रोजी प्राप्‍त झालेल्या सर्व हरकती व सुचना सुनावणीसाठी प्रांताधिकार्‍यांकडे सादर केल्या जाणार आहेत. प्रांताधिकारी सूचना व हरकतींवर सुनावणी घेणार आहेत. त्यानंतर 31 जुलैपर्यंत सुचना व हरकतींवर झालेल्या सुनावणीनंतर अभिप्रायासह अंतिम निर्णयासाठी प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केले जाणार आहेत.

प्रांताधिकार्‍यांकडून आलेले प्रस्ताव तपासून जिल्हाधिकारी प्रभाग रचना व आरक्षणाला 6 ऑगस्टला अंतिम मान्यता  देणार आहेत. त्यानंतर 9 ऑगस्टला जिल्हाधिकार्‍यांनी मंजुरी दिलेल्या अंतिम प्रभाग रचनेला व्यापक प्रसिध्दी दिली जाणार आहे.  दरम्यान, जिल्ह्यातील 122 ग्रामपंचायतींचे  निवडणुकीसंबंधी जिल्हा परिषदेकडून प्रस्ताव सादर झाले होते. नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींची निवडणूक होणार असून या ग्रामपंचायतींच्या प्रारुप प्रभाग रचना तसेच आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली.

दरम्यान, जिल्ह्यातील 122 ग्रामपंचायतींची निवडणूक होणार असली तरी जिल्हा परिषदेकडून या निवडणूक कामकाजासंबंधी प्रस्ताव येत आहेत. त्यामुळे निवडणूक लागणार्‍या ग्रामपंचायतींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर संबंधित गावांमधील नेत्यांमध्ये निवडणूक कार्यक्रमाची उत्सुकता लागली आहे.