Tue, Jun 02, 2020 00:03
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › बाराशे पोलिसांची वेतनवाढ रोखली!

बाराशे पोलिसांची वेतनवाढ रोखली!

Published On: Sep 06 2018 1:57AM | Last Updated: Sep 05 2018 11:02PMकराड : अमोल चव्हाण

संपूर्ण जिल्ह्यातील 2500 पोलिसांपैकी सुमारे 1200 पोलिसांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे. संगणक हाताळण्याचे ज्ञान नसल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. यामुळे दरवर्षी मिळणार्‍या साडेतीन टक्के वार्षिक वेतन वाढीपासून अनेक पोलिसांना वंचित राहावे लागले आहे. शासनाच्या नवीन अध्यादेशामुळे पोलिसांमध्ये खळबळ उडाली  असून संगणक हाताळण्याचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पोलिसांची पळापळ सुरू झाली आहे.

समाजात कायदा व सुव्यवस्था राहावी, जातीय तेढ निर्माण होऊ नये, यासह विविध कारणांनी पोलिस कर्मचारी महत्त्वाची भूमिका बजावत असतो. सामाजिक शांतता अबाधित राहावी म्हणून पोलिस रात्रंदिवस प्रयत्न करत असतात. कायद्याची अंमलबजावणी करत असताना कायदा मोडणार्‍यांना शासन व्हावे यासाठी पोलीस आपली भुमिका पार पाडत असतात. सामाजिक शांतता कायम राहावी यासाठी प्रयत्न करणार्‍या पोलिसांना शासनाच्या वतीने दर वर्षी साडेतीन टक्के वेतनवाढ दिली जाते. परंतु, यावर्षी पोलिसांना ही वेतनवाढ मिळण्यासाठी संगणकाचे ज्ञान घेणे गरजेचे आहे. त्यासाठी परिपत्रक काढून सर्व पोलीस कर्मचार्‍यांना संगणक हाताळणीचे ज्ञान असल्याबाबतचे प्रमाणपत्र देण्याबाबत सूचना करण्यात आली आहे. परंतु जिल्ह्यातील 2500 पैकी बाराशे पोलिस कर्मचार्‍यांनी अद्यापपर्यंत संगणक हाताळणी ज्ञान असल्याचे प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे.

तसे पाहिले तर साधारणपणे जिल्ह्यातील पोलिस कर्मचारी मे महिन्यापासून आंदोलन, मोर्चे यासह विविध कारणांनी बहुतांशी वेळा बंदोबस्तावरच राहिले आहेत. त्यामुळे त्यांना संगणकाचे ज्ञान मिळवण्यासाठी किंवा ज्ञान मिळण्यासाठी आवश्यक त्या बाबी पूर्ण करता आल्या नाहीत. ज्या वेळेस पोलीस दलात दाखल झाले त्यावेळी संगणक ज्ञानाची आवश्यकता नव्हती. परंतु शासनाने आता नव्याने हा निकष घातल्याने पोलिसांसमोर अडचण निर्माण झाली आहे. संगणक हाताळता येत नसल्याने जिल्ह्यातील पोलिसांना फटका बसला आहे. 

वाहनचालक व पन्‍नास वर्षांवरील कर्मचार्‍यांना सूट

संगणक हाताळण्याचे प्रमाणपत्र असल्याशिवाय वेतनवाढ मिळणार नसल्याचे वरिष्ठांनी सांगितल्याने अनेकांची पळापळ सुरू असतानाच वाहनचालक व पन्‍नास वर्षांपुढील पोलिस कर्मचार्‍यांना या निर्णयातून वगळण्यात आले आहे. त्यांना संगणक हाताळणीचे ज्ञान असणे बंधनकारक करण्यात आलेले नाही; परंतु अशा कर्मचार्‍यांनी आपण वाहनचालक असल्याचा किंबहुना आपले वय 50 वर्षांपेक्षा जास्त असल्याबाबतचा दाखला देणे बंधनकारक करण्यात आले आहे.