होमपेज › Satara › महिंद लुघ पाटबंधारेसाठी ११ कोटी

महिंद लुघ पाटबंधारेसाठी ११ कोटी

Published On: Jun 18 2018 1:12AM | Last Updated: Jun 17 2018 8:35PMसणबूर : वार्ताहर                        

महिंद (ता. पाटण) लघु पाटबंधारे योजनेसाठी आ. शंभूराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नातून 11 कोटी 55 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. 13 जून रोजी शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार तलावाच्या दुरूस्तीसाठी सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या निधीतून भूसंपादनाबरोबर या प्रकल्पातील पुनर्वसित गावठाणांतील नागरी सुविधांसह काही महत्त्वाची कामे हाती घेण्यात येणार आहेत. तसेच तलावाच्या दुरुस्तीच्या कामासाठी शासनाने 76 लाखांचा निधी मंजूर केला असल्याचीही माहिती पत्रकाव्दारे देण्यात आली आहे.

पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील महिंद लघु पाटबंधारे योजनेकरीता राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने 03 कोटी 54 लक्ष 52 हजार इतक्या किंमतीस प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता दिली होती.

सदर प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्ताव सन 1995-1996 च्या दर सुचीवर आधारित होता. प्रकल्पाचे काम सुरु असताना दर सुचीतील वाढ, भूसंपादन किंमतीतील वाढ, संकल्पचित्र बदलामुळे वाढ, अपुरी तरतूद, इतर कारणांमुळे व अनुषंगिक खर्चातील वाढीमुळे 2009- 2010 ची दर सूची वापरुन सुधारित अंदाजपत्रक तयार करुन रुपये 11 कोटी 55 लाख 37 हजार इतक्या किंमतीचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या सातारा पाटबंधारे विभागामार्फत सादर करण्यात आला होता. या प्रस्तावास व्दितीय सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात यावी, याकरीता राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांचेकडे आ. देसाई यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु होता. 

भूसंपादनाबरोबर या प्रकल्पातील पुनर्वसित गावठाणांतील नागरी सुविधांबरोबर काही महत्वाची कामे हाती घेण्यात येणार आहेत. धरण सांडवा व चॅनेल, इमारती, विमोचक, कोल्हापूर पध्दतीचे बंधारे, वृक्षारोपन, देखभाल, दळणवळण या कामांचा समावेश असून कामांसाठी रु.1090.13 लक्ष व अनुषंगिक खर्चासाठी 65.24 लक्ष अशी विगतवारी करण्यात आली असून अनुषंगिक खर्चामधून या तलावामुळे पुर्नवसित झालेल्या मौजे चौगुलवाडी येथील पुर्नवसित गावठाणांतील नागरी सुविधांची कामे करण्यात येणार आहेत. योजनेची सिंचन क्षमता ही 304 हेक्टर असून सिंचन क्षेत्रामध्ये एकूण पाच गावांचा समावेश आहे. 

तलावाची पाणी साठवण क्षमता ही 2404 स.घ.मी इतकी असून सिंचन क्षेत्रामधील सळवे महिंद,बाचोली बनपुरी व सणबूर या पाच गांवामध्ये अनुक्रमे 21 हे.आर., 39 हे.आर., 70 हे.आर., 139 हे.आर. व  हे.आर. क्षेत्र सिंचनाखाली येत असल्याचे म्हंटले असून व्दितीय सुधारित प्रशासकीय मान्यता दिलेल्या या कामांना मंजूर करण्यात आलेला निधी लवकरच सुपूर्द करण्यात येणार असल्याचे आमदार शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे.