Sat, Apr 20, 2019 07:51होमपेज › Satara › कोयनेत १३६ टीएमसीची आवक

कोयनेत १३६ टीएमसीची आवक

Published On: Aug 28 2018 1:45AM | Last Updated: Aug 27 2018 10:39PMपाटण : प्रतिनिधी 

महाराष्ट्राची वरदायिनी मानल्या जाणार्‍या 105 टीएमसी क्षमता असलेल्या कोयना धरणात 1 जूनपासून रविवारी सकाळपर्यंत तब्बल 136 टीएमसी पाण्याची आवक झाली होती. त्यामुळेच वीज निर्मिती आणि पाण्याचा वापर न करता कोयना नदीत तब्बल 52.50 टीएमसी पाणी सोडून देण्यात आले आहे. दरम्यान, कोयना धरणात 104.16 टीएमसी इतके पाणी असून धरणाचे दरवाजे साडेपाच फुटांनी उचलण्यात आले आहेत.

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील महाबळेश्‍वर, नवजा, कोयना परिसरात जून महिन्यात जेमतेम पाऊस झाला होता. मात्र, त्यानंतर जुलैच्या पहिल्या पंधरवड्यानंतर कोयना धरण पाटणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरू झाला होता. त्यानंतर 16 जुलैपासून पायथा वीजगृहात वीजनिर्मिती करून प्रत्येक दिवशी प्रतिसेकंद 2 हजार 100 क्युसेस पाणी सोडले जात असून आजही ते सोडण्यात येत आहे. तर दुसरीकडे चालूवर्षी दरवर्षीच्या  सरासरीच्या तुलनेत जास्त वीजनिर्मिती करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. सिंचनासाठी आत्तापर्यंत 1.73 टीएमसी, तर पूरकाळात 6.26 टीएमसी अशा एकूण 8 टीएमसी पाण्यावर वीजनिर्मिती करण्यात आली आहे.

तर आत्तापर्यंत तीनवेळा धरणाचे दरवाजे टप्प्याटप्प्याने उचलून त्यातून 44.50 टीएमसी पाण्याचा कोणताही वापर न करता थेट पाणी नदी पात्रात सोडून देण्यात आले आहे.यावर्षी आजवर धरणाचे दरवाजे कमीत कमी एक तर सर्वाोधिक साडेसहा फुटांपर्यंत वर उचलण्यात आले आहेत. मात्र आता पाणी साठवण क्षमता संपुष्टात आल्याने जर धरणांतर्गत विभागात ज्यादा पाऊस होऊन मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक झाली. तर याहीपेक्षा दरवाजे जास्त उंच उचलून त्यातून पूर्वेकडे पाणी सोडावे लागणार आहे. दरवर्षीची सरासरी पाहता यावर्षी त्या तुलनेत पाऊसही जास्त झाला आहे. एक जूनपासून आत्तापर्यंत कोयना येथे 5 हजार 110 मी. मी., नवजा 5 हजार 492 मी. मी. तर महाबळेश्‍वर येथे 4 हजार 799 मि. मि. पावसाची नोंद झाली आहे. 

मूळगाव पूल पाण्याखाली

पाटणनजीकचा मूळगाव पूल पाण्याखाली गेला आहे. तर मोरणा विभागाला जोडणार्‍या नेरळे पुलाला पाणी टेकले आहे.