Sun, May 26, 2019 10:37होमपेज › Satara › 10 लाखांच्या जुन्या नोटा बाळगणार्‍यास अटक 

10 लाखांच्या जुन्या नोटा बाळगणार्‍यास अटक 

Published On: Aug 29 2018 1:44AM | Last Updated: Aug 28 2018 11:21PMभुईंज : वार्ताहर

नोटाबंदीमुळे रद्द झालेल्या जुन्या चलनी नोटा बदलून घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या बाजीराव अण्णा मोरे (रा. राणगेघर, ता. जावली) याला भुईंज पोलिसांनी सोमवारी पाचवड (ता. वाई) येथील बैल बाजारतळावर पकडले. त्याच्याकडून दहा लाख रुपयांच्या जुन्या चलनी नोटा पोलिसांनी जप्त केल्या असून, याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, आरोपीस अटक केल्याची माहिती सपोनि बाळासाहेब भरणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

याबाबत भुईंज पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जावली तालुक्यातील बाजीराव मोरे यांच्याकडील जुन्या चलनी नोटा घेऊन त्या नव्या चलनात बदलून देण्यासाठी काही जण पाचवड (ता. वाई) येथे सोमवारी बाजारात येणार असल्याची माहिती खबर्‍याकडून भुईंज पोलिसांना मिळाली. त्यानुसार भुईंजचे सपोनि बाळासाहेब भरणे, पोलिस उपनिरीक्षक दुर्गानाथ साळी़, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे बापुराव धुरगुडे़, जितेंद्र शिंदे़, प्रवीण कांबळे़, प्रसाद दुदुस्कर, सचिन ससाणे यांच्या पथकानेरात्री 8 च्यादरम्यान पाचवड बैलबाजारात सापळा रचला. त्यावेळी पोलीसांनी संशयावरून बाजीराव अण्णा मोरे रा.राणगेघर ता.जावली याची झडती घेतली असता त्याच्याकडे 10 लाख रूपयांच्या जुन्या नोटा असलेली बॅग व मोटार सायकल  दुचाकीसह पोलीसांनी ही रक्कम जप्त करून मोरे याला ताब्यात घेवून अटक केली आहे.

दरम्यान, अटक केलेला संशयीत आरोपी बाजीराव मोरे हा या नोटा नेमक्या कोणाकडून आणून कोणाला देणार होता याबाबत मंगळवारी दुपार पर्यंत पोलीस चौकशी करीत होते. तो चौकशीस वेगवेगळया पद्धतीने उत्‍तर देताना कधी या नोटा मुंबईंत कचरा कुंडीत सापडल्या तर कधी कोण्या बिल्डरचे हस्तकाकडून आल्याचे सांगत असल्याने पोलिसांनी नेमक्या सुत्रधारापर्यंत पोहचता आले नाही. त्याला वाई न्यायालयात हजर केले असता बंद झालेले चलन अजूनही ग्रामीण भागात एवढया मोठया प्रमाणात सापडत असल्याने मोदी सरकारच्या नोटाबंदी पूर्णता यशस्वी झाली की नाही याबाबत सर्व सामान्यांच्यात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

संशयीत आरोपी मोरे हा कुडाळमधील काही तरूणांच्या मदतीने पाचवडच्या बैल बाजारात नोटा बदलून घेण्यासाठी पोहचला. मात्र, त्याला यात गोवणारे नेमके  भैय्यानामक तरूण कोण अशीही चर्चा पाचवड परिसरात जोर धरू लागली आहे. दहा लाख रूपयांच्या जुन्या नोटा पंचनामा करून मोजत असताना नोटांमध्ये 1000 रूपयांच्या 3 नोटा कमी असल्याने पोलीस पंचनाम्यात 9 लाख 97 हजार रूपये किमतीच्या नोटा व जप्त केलेली दुचाकी असा समावेश आहे.