Fri, Aug 23, 2019 14:55होमपेज › Satara › ५१ रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी १० कोटी 

५१ रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी १० कोटी 

Published On: Jan 07 2018 2:03AM | Last Updated: Jan 06 2018 10:41PM

बुकमार्क करा
कराडः प्रतिनिधी

मलकापूर नगरपंचायतीच्या हद्दीतील विविध भागातील 51 रस्ते खडीकरण व डांबरीकरण करून दुरुस्त करण्यात येणार आहेत. त्यासाठी नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत सुमारे 10 कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निविदा काढण्यास मंजुरी देण्यात आली असून एप्रिल अखेर शहरातील सर्व रस्ते चकाचक करण्याचा निर्धार करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सुनिता पोळ होत्या. यावेळी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, मुख्याधिकारी संजिवनी दळवी प्रमुख उपस्थित होत्या.

मलकापूरात राबवण्यात येत असलेल्या सांडपाणी प्रक्रिया योजनेसाठी शहरातील रस्ते मोठ्या प्रमाणावर उकरण्यात आले आहेत. यामुळे शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून त्याची दुरुस्ती  करणे गरजेचे आहे. याचा विचार करून नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत 9 कोटी 73 लाख 49 हजार 589 रुपयांच्या रस्ते दुरुस्ती कामांच्या निविदा काढण्यास मंजुरी देण्यात आली. यामध्ये शहरातील 51 रस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. हे सर्व रस्ते एप्रिल अखेर दुरुस्त करून चकाचक करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

मलकपुरने स्वच्छता सर्वेक्षण अभियानामध्ये मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली असून विविध पातळ्यांवर सक्षमपणे काम सुरू आहे. स्वच्छता सर्वेक्षणामध्ये सर्व घटकांचा सहभाग व्हावा यासाठी प्रबोधन केले जात असून लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्था व संघटनांचे पदाधिकारी यांना बरोबर घेऊन स्वच्छता अभियान राबवले जात आहे. त्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. या अभियानामध्ये शहरातील नागरिक महिला उत्स्फूर्तपणे सहभागी होत असल्याची माहिती उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी दिली.

स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वच्छ प्रभाग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धा नगरपंचायत कार्यक्षेत्रात आयोजित करण्यासही सभेत मंजुरी देण्यात आली. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक तसेच प्रभागातील विविध घटकांनी एकत्रित येऊन नियोजन करण्याबाबतचा निर्णय सभेत घेण्यात आला. त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य नगरपंचायतीतर्फे केले जाईल, असेही शिंदे यांनी सांगितले. घनकचरा व्यवस्थापनांतर्गत मलकापूर कचराकुंडी मुक्त करण्याच्या दृष्टीने ठिकठिकाणी जाहीर सूचना फलक तयार करून जागेवर बसविण्याच्या कामाबाबतही सभागृहात चर्चा करण्यात आली.

अयोध्यानगरीत पाईप टाकण्याच्या कामास मंजुरी..

नगरपंचायत हद्दीतील अयोध्यानगरी येथील बबनराव शिंदे यांच्या घरापासून गणेश प्लाझा पर्यंतचा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे तसेच अयोध्या नगरी येथील अंगणवाडीच्या  पाठीमागे साचणार्‍या सांडपाण्याच्या निचर्‍यासाठी सिमेंट पाईप टाकण्याच्या कामाची  निविदा काढण्यास सभागृहात मंजुरी देण्यात आली. यासाठी आवश्यक त्या निधीची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती मनोहर शिंदे यांनी सभागृहात दिली.