होमपेज › Satara › जिल्ह्यात साखरेचा 1.42 लाख टन बफर स्टॉक 

जिल्ह्यात साखरेचा 1.42 लाख टन बफर स्टॉक 

Published On: Jul 02 2018 1:49AM | Last Updated: Jul 01 2018 11:44PMसातारा : महेंद्र खंदारे

देशांतर्गत साखरेच्या उतरलेल्या दरावर मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकारने 30 लाख टन साखरेचा बफर स्टॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. हा बफर स्टॉक जाहीर केल्यामुळे 2900 रुपये क्‍विंटल असणारी साखर 3300 रुपये क्‍विंटल होईल, असा अंदाज व्यक्‍त केला जात आहे. केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे साखर कारखान्यांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला आहे. दि. 29 रोजी झालेल्या बैठकीत केंद्र सरकारने कारखानानिहाय हा कोटा जाहीर केला असून यानुसार सातारा जिल्ह्यातील 14 कारखाने 1 लाख 42 हजार  256 टन साखरेचा बफर स्टॉक करणार आहेत. 

गत दोन वर्षांच्या तुलनेत यंदा साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. उत्पादनाचा आलेख वाढल्यामुळे साखरेचे दर धडाधड कोसळले. हंगामाच्या सुरुवातीला प्रतिक्‍विंटल 3 हजार 400 रुपये असणारा दर हंगाम संपेपर्यंत 2 हजार 500 रुपयांपर्यंत खाली आला होता. 

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी उसाची एफआरपी वाढली होती. पण साखरेचे दर कोसळल्याने कारखान्यांना एफआरपी देता येत नव्हती. त्यामुळे जिल्ह्यात 333 कोटी रूपयांची देणी थकली आहेत. या परिस्थितीवर मात करण्यासाठी साखर उद्योगांकडून काही मागण्या केंद्र सरकारकडे करण्यात आल्या होत्या. यामध्ये साखरेचा हमीभाव प्रतिक्‍विंटल 2 हजार 900 रूपये निश्‍चित करावा. सक्‍तीची साखर निर्यात, त्यासाठी अनुदान व बफर स्टॉक करण्यास परवानगी द्यावी, याचा समावेश होता. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या 6 जून रोजी झालेल्या बैठकीत या सर्व मागण्या मान्य करून त्याच दिवसापासून त्याची अंमलबजावणी सुरू करण्याचे ादेश निघाले. या निर्णयामुळे साखरेच्या दरातही वाढ झाली होती. परंतु, कारखानानिहाय बफर स्टॉक जाहीर झाला नव्हता. यानंतर दि. 25 रोजी बफर स्टॉक जाहीर करण्यात आला होता. हा बफर स्टॉक 29 रोजी अंतिम करण्यात आला. यामध्ये देशातील एकूण 500 कारखान्यांचा समावेश आहे. 

यामार्फत देशभरात 30 लाख टन साखरेचा बफर स्टॉक करण्यात येणार आहे. 31 मे रोजी कारखान्यांकडे उपलब्ध असणार्‍या साठ्याच्या आधारावर बफर स्टॉक निश्‍चित करण्यात आला आहे. ज्या कारखान्यांना बफर स्टॉक नको होता त्यांनी तश सूचना सरकारला केल्या होत्या. बफर स्टॉक जाहीर केल्यानंतर कारखानदारांना यासाठी गोदामाचे भाडे व विमा हफ्त्याची रक्‍कम मिळणार आहे. यासाठी केंद्राने 1 हजार 175 कोटी रूपयांची तरतूद केली आहे. हा बफर स्टॉक जाहीर झाल्यामुळे कारखानदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरवाढ झाल्यानंतरच ही साखर आता बाहेर निघणार असल्यामुळे पुन्हा साखर 3 हजार क्‍विंटलच्या घरात जाणार आहे. केंद्राच्या या निर्णयाचा फायदा काही प्रमाणात शेतकर्‍यांनाही होणार आहे. जिल्ह्यात 11 कारखान्यांची 333 कोटींची देणी आहेत. या बफर स्टॉकमुळे पुढील महिन्यात ही देणी शेतकर्‍यांना मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे बँकांची कर्जेही कारखान्यांना आता देता येणार असल्याने कारखाने अडचणीतून बाहेर येणार आहे. 

केंद्र सरकारच्या आकडेवारी नुसार जिल्ह्यातील कारखान्यांना पुढीलप्रमाणे बफर स्टॉक निश्‍चित करण्यात आला आहे. अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना 10 हजार 476 टन, लोकनेते बाळासाहेब देसाई 3 हजार 496 टन, किसनवीर भुईंज 10 हजार 121 टन, यशवंतराव मोहिते कृष्णा कारखाना 23 हजार 788 टन, रयत 6 हजार 768 टन, सह्याद्री 35 हजार 33 टन, श्रीराम 4 हजार 454 टन, किसनवीर खंडाळा 5 हजार 300 टन, न्यू शुगर 1 टन, जयवंत शुगर 10 हजार 996 टन, ग्रीन पावर 7 हजार 484 टन, स्वराज्य इंडीया 5 हजार 721, शरयू 8 हजार 915 आणि जरंडेश्‍वर कारखाना 9 हजार 703 टन असा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे 1 लाख 42 हजार 256 टन एवढा साखरेचा बफर स्टॉक राहणार आहे.