Sat, Jun 06, 2020 00:15होमपेज › Satara › ‘सेल्फी पॉईंट’ कराडची बनतेय नवी ओळख

‘सेल्फी पॉईंट’ कराडची बनतेय नवी ओळख

Published On: Sep 23 2019 1:58AM | Last Updated: Sep 22 2019 10:04PM
कराड : प्रतिभा राजे 

महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांचे समाधीस्थळ, कृष्णाकाठ व प्रीतीसंगम बाग अशी ओळख असणार्‍या कराड शहराने स्वच्छ सर्वेक्षणमध्ये देशात प्रथम क्रमांक पटकावला.  शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी पालिका कार्यरत असतानाच ‘आय लव्ह कराड’, पालिकेत बसविण्यात आलेले ‘राजहंस’,  बारा डबरी परिसरातील ‘फुलांचे उद्यान’ ही नागरिकांसाठी सेल्फी पाँईट होत आहे तर विजय दिवस समारोहच्यावतीने युवकांसाठी प्रेरणादायी असणारे सैन्यदलाच्या वायूसेनेचे विमान आणि रशियन बनावटीचा  रणगाडा नागरिकांना भुरळ घालत आहेत. त्यामुळे कराडची ओळख ‘सेल्फी पॉईंट असणारे शहर’ म्हणून भविष्यात होईल. 

कराड शहरामध्ये स्वच्छतेची चळवळ सुरू झाल्यावर पालिकेने शहरातील कोपरा अन् कोपरा स्वच्छ कसा राहिल याकडे लक्ष दिले. तसेच  टाकाऊपासून टिकाऊ वस्तू करून त्यापासून शोभिवंत वस्तू बनू शकतात याचा आदर्श नगरपालिकेच्या अधिकारी, पदाधिकारी व कर्मचार्‍यांनी घालून दिला. त्यामुळेच कराड पालिकेच्या आवारात प्लास्टिकच्या बाटल्यांपासून  राजहंस बसविण्यात आले आहे. त्यामुळे पालिकेच्या सौंदर्यात भर पडत आहेच परंतु त्याठिकाणी सेल्फी काढण्याचा मोहही नागरिकांना होत आहे. पालिकेत नेहमीच नागरिकांची गर्दी असते. त्यामुळे ये — जा करणारे नागरिक याठिकाणी आवर्जून थांबत सेल्फी घेत असल्याचे दिसून येते. कचर्‍यापासून खतनिर्मिती, वीजनिर्मिती करीत असताना पालिकेने कचरा कुंडीचे सुंदर उद्यान तयार केले.  

प्रचंड दुर्गंधी असणार्‍या ठिकाणी नागरिक जाणेही टाळत असत, मात्र सध्या त्याठिकाणी झालेल्या बगिचामुळे नागरिकांची पाऊले आता आपोआपच तिकडे वळत आहेत. बारा डबरे कचरा डेपो आता बगिचा होत आहे. कराडचे रूप पालटत असताना  विजय दिवस समारोहच्यावतीने समितीचे प्रमुख निवृत्त कर्नल संभाजीराव पाटील यांच्या प्रयत्नातुन सैन्यदलाच्या वायूसेनेचे विमान आणि रशियन बनावटीचा एक रणगाडा येथील यशवंतराव चव्हाण टाऊन हॉलमध्ये बसवून कराडच्या वैभवात भर घातली आहे.

भारतीय सैन्यदलाबद्दल युवक आणि विद्यार्थ्यांना अभिमान वाटावा ते राष्ट्रभक्‍तीने प्रेरीत व्हावेत आणि त्यांच्यामध्ये सैन्यदलात भरती होण्यासाठी उर्जा निर्माण व्हावी या हेतूने रणगाडा व विमान बसविण्यात आले आहे. याचा लोकार्पण सोहळा नुकताच झाला. यावेळी अनेक तरूणांनी सेल्फी काढत आनंद व्यक्‍त केला.  शहरातील अनेक ठिकाणे सेल्फी पॉईंट होणार यात शंका नाही. शहरातील ऐतिहासिक ठिकाणांना भेट देणार्‍या पर्यटकांसाठी हे पॉईंट पर्वणी ठरणार आहे तर दरवर्षी स्व. यशवंतराव चव्हाण समाधीस्थळास भेट देणार्‍या विविध शाळांचे विद्यार्थी या पॉईंटचा आनंद मनमुराद लुटतील त्यामुळे कराडला आणखी नवीन ओळख निर्माण होत आहे. 

बारा डबरी नाव बदलण्यात येणार
शहरातील सर्व ड्रेनेजेचे पाणी बारा डबरी परिसरामध्ये जात असे. त्याठिकाणी असणार्‍या बारा मोठ्या डबर्‍यांमध्ये हे पाणी एकत्रित केले जात असल्याने या परिसराला बारा डबरी नाव पडले होते. मात्र, आता या परिसराचे रूपडे पालटत आहे. याठिकाणी सुंदर मोठा बगीचा होत आहे. त्यामुळे ‘बारा डबरी’ हे नाव बदलण्याचा नगरपालिकेचा मानस आहे.