Sat, Apr 20, 2019 18:28होमपेज › Satara › जिल्ह्यातील ५३ शाळांवरील संकट दूर होणार

जिल्ह्यातील ५३ शाळांवरील संकट दूर होणार

Published On: Dec 20 2017 1:45AM | Last Updated: Dec 19 2017 10:45PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 72 शाळा बंद होणार असल्यातरी त्यापैकी 8 शाळांची पटसंख्या वाढली आहे. तसेच  दोन शाळांमधील अंतर एक किलोमीटरपेक्षा जास्त असल्याने अनेक शाळा आरटीईच्या निकषानुसार बंद करता येणार नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील अशा एकूण सुमारे 53 शाळांवरील बंदीचे संकट दूर होण्याची शक्यता आहे. कमी गुणवत्तेमुळे पटसंख्या खालावत असणार्‍या 1314 शाळा बंद करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले होते. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील सुमारे 72 शाळा बंद होणार होत्या. आरटीईनुसार मुलाला प्राथमिक शिक्षण  हे घरापासून एक किलोमिटरच्या आतील शाळेत उपलब्ध झाले पाहिजे. तर उच्च प्राथमिक शिक्षण घरापासून तीन किलोमीटरच्या शाळेत उपलब्ध होण्याची आवश्यकता आहे. या पार्श्‍वभुमीवर राज्याचा शालेय शिक्षण विभाग खडबडून जागा झाला असून फेरसर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. 

सातारा जिल्ह्यातील 72 शाळा बंद होत असल्या तरी सप्टेंबर 2017 च्या पटनिश्‍चितीनुसार  जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील  बावडा, रामनगर, भोसलेवाडी, वाई तालुक्यातील  सोमेश्‍वरवाडी, सनवीरनगर, मोर्जीवाडा, दत्तनगर तर महाबळेश्‍वर तालुक्यातील कासरूड या 8  शाळांची पटसंख्या वाढली आहे. तसेच 11 शाळांचा 10 च्या आत पट आहे त्यांना 1 किलोमीटर परिसरात शाळा उपलब्ध असल्याने त्यांचे समायोजन होणार असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनिता गुरव  यांनी सांगितले. मात्र, 72 पैकी 53 शाळांचे आरटीईच्या निकषानुसार नजिकच्या शाळात समायोजन करता येणार नाही.  शाळा बंद  करायची आणि दुसर्‍या शाळेत समायोजन करावयाचे अंतर एक किलोमीटरपेक्षा जास्त आहे त्यामुळे  या 53 शाळांवरील संकट दूर होण्याची शक्यता आहे.

ज्या शाळेत 2 शिक्षक आहेत त्या शाळेतील  शिक्षक अन्य शाळांमध्ये वर्ग करता येतील का, यादृष्टीने गटशिक्षणाधिकार्‍यांना प्रत्येक शाळेचा आढावा घेण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी  दिल्या असून त्यानुसार जिल्ह्यात कार्यवाही सुरू असल्याचे पुनिता गुरव यांनी सांगितले.