Tue, Jun 25, 2019 22:01होमपेज › Sangli › जि. प. भरती पेपरफुटीचा लाभार्थी आरोग्य सेवेत

जि. प. भरती पेपरफुटीचा लाभार्थी आरोग्य सेवेत

Published On: Dec 15 2017 2:46AM | Last Updated: Dec 14 2017 11:42PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या सन 2015 च्या आरोग्य सेवक महिला भरतीतील पेपरफुटीमधील एक लाभार्थी आरोग्य सेवक महिला या पदावर कार्यरत आहे. आरोग्य सेवक महिला पदाच्या परीक्षेला 60 प्रश्‍नांच्या उत्तरांची चिठ्ठी घेऊन परीक्षा दिल्याचा जबाब पोलिसांना दिला होता. संबंधित महिलेचा हा जबाब चव्हाट्यावर आला आहे. 

जिल्हा परिषदेची सन 2015 ची कर्मचारी भरती पेपरफुटी प्रकाराने महाराष्ट्रभर गाजली. दि. 25 नोव्हेंबर 2015 रोजी आरोग्य सेवक पुरूष आणि आरोग्य सेविका महिला या पदाचा पेपर फुटला होता. शाहीन जमादार या परीक्षार्थीकडे उत्तरांची कॉपी सापडली होती. पेपरफुटीप्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. सुमारे 26 जणांवर एफआयआर दाखल आहे. यामध्ये जिल्हा परिषदेकडील काही कर्मचार्‍यांचाही समावेश होता. पेपरफुटी प्रकरणाचा तपास वादाच्या भोवर्‍यात सापडला होता. सध्या हे प्रकरण अनेकांच्या विस्मरणातून गेले होते. पण ते आता एका प्रकाराने पुन्हा ऐरणीवर आले आहे. 

लाभार्थी डीबार झालेच नाहीत!

आरोग्य सेवक, आरोग्य सेविका भरतीचा पेपर फुटल्यानंतर दि. 29 नोव्हेंबर रोजी फेरपरीक्षा झाली होती. फेरपरीक्षेनंतर चार तासात निकाल लावला होता. निकाल टफ लागला होता.आरोग्य सेवक पुरूष पदाच्या 8 जागांसाठी 280 उमेदवारांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी केवळ 27 जण उत्तीर्ण झाले होेते. आरोग्य सेवक महिला पदाच्या 38 जागांसाठी 742 उमेदवारांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 65 उमेदवार उत्तीर्ण झाले होते. पेपरफुटी प्रकरणातील लाभार्थी उमेदवार फेरपरीक्षेत निवड यादीत आले तरी त्यांना ‘डीबार’ केले जाणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले होते. मात्र पेपरफुटीचा एक लाभार्थी फेरपरीक्षेद्वारे आरोग्य सेवेत कार्यरत असल्याची माहिती चव्हाट्यावर आली आहे. 
 

पोलिस अहवालानुसार निकाल राखून ठेवल्याने प्रकार चव्हाट्यावर

मराठा आरक्षणातील 19 उमेदवारांना 11 महिन्यांसाठी तात्पुरती  नियुक्तीसाठी अंतिम निवड यादी लागली आहे. यातील आरोग्य विभागाकडील 8 पदांसाठी अंतिम निवड यादीस विलंब लागला. नुकतेच अंतिम निवड यादी लागली. पण या निवड यादीतील पहिल्या क्रमांकावरील उमेदवाराचा निकाल सन 2015 च्या भरतीतील पोलिस अहवालानुसार स्थगित ठेवण्यात आल्याचे नमूद केले आहे. संबंधित उमेदवाराच्या नातेवाईकाने त्यास आक्षेप घेतला आहे. 

सन 2015 च्या भरतीतील चौकशीदरम्यान पोलिसांना जबाब दिलेला आहे. काहींनी आमच्याकडे संपर्क साधला होता मात्र सात लाख रुपयांची मागणी केल्याने आम्ही नकार दिला होता. केवळ फोन आला म्हणून आमचा निकाल स्थगित ठेवणे अन्याय्य आहे. पेपरफुटीचा एक लाभार्थी मात्र आरोग्य सेवेत नोकरीत कसा लागला, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला आहे. संबंधितांनी याप्रकरणी गुरूवारी जिल्हा परिषद आरोग्य विभागात तक्रार केली आहे.