Thu, Jun 27, 2019 02:30होमपेज › Sangli › युवकाचे अपहरण करून मारहाण

युवकाचे अपहरण करून मारहाण

Published On: Jun 14 2018 1:35AM | Last Updated: Jun 13 2018 11:21PMसांगली : प्रतिनिधी

एका महिलेला मेसेज केल्याच्या कारणावरून एका युवकाचे अपहरण करून दोन दिवस त्याला डांबून ठेवून  बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये निखील राजू शिकलगार (वय 17, रा. सम्राट व्यायाम मंडळाजवळ) जखमी झाला आहे. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी दहाजणांविरोधात सांगली शहर पोलिस ठाण्यात अपहरण, मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कपील शिंदे, किरण भंडारे, तबरीस तांबोळी, चिव्या (पूर्ण नाव नाही), स्वप्नील (पूर्ण नाव नाही), अतुल (पूर्ण नाव नाही) व अनोळखी चार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी जखमी निखीलने फिर्याद दिली आहे. 

निखील आणि संशयित कपील शिंदेची ओळख आहे. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास निखील खणभागातून जात असताना कपील तेथे मोटारसायकलवरून आला. त्याला थांबवून कपीलने त्याला कानाखाली मारले. त्यानंतर मोटारसायकलवर बस नाहीतर जीवे मारीन अशी धमकी दिली. नंतर निखीलला मोटारसायकलवर घेऊन तो कत्तलखान्याजवळ असलेल्या लोंढे मळ्यात घेऊन गेला. तेथे गेल्यानंतर अन्य संशयित तेथे आधीपासूनच थांबले होते. तेथून निखीलला कत्तलखान्याच्या कंपाऊंडमध्ये नेले. तेथे गेल्यावर सर्व संशयितांनी शिवीगाळ करीत त्याला बेदम मारहाण कली. 

नंतर  त्या महिलेला मेसेज का केलास असा जाब विचारत त्याला पाकिजा मस्जीद चौक, शामरावनगर येथे नेऊन पुन्हा बेदम मारहाण केली. त्या रात्री त्याला शहरात विविध ठिकाणी फिरवले. नंतर मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास पुन्हा कत्तलखाना परिसरात नेले. तेथे जवळच असणार्‍या शेतात नेऊन त्याच्या डोक्यात  बिअरच्या दोन बाटल्या फोडण्यात आल्या. नंतर अतुलने लोखंडी पाईपने पायावर जोरदार मारहाण केली. 

नंतर निखीलला त्या महिलेकडे नेण्यात आले. तेथे महिलेने समजूत  घालून सर्व संशयितांना पाठवून दिले. त्यावेळी संशयितांनी पोलिसात तक्रार केलीस तर  याद राख  अशी धमकीही दिली. नंतर निखीलला पैसे देऊन घरी पाठवले.  त्याला सांगलीच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  त्याच्या फिर्यादीनुसार दहाणांविरोधात अपहरण, मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.