Wed, Jul 24, 2019 14:08होमपेज › Sangli › इस्लामपूरमध्ये तरुणाचा निर्घृण खून

इस्लामपूरमध्ये तरुणाचा निर्घृण खून

Published On: Mar 21 2018 1:43AM | Last Updated: Mar 20 2018 11:52PMइस्लामपूर : वार्ताहर

आर्थिक देवघेवीतून येथील अमित मोहन वीरकर (वय 32, रा. किसाननगर) या तरुणाचा मित्रांनीच डोक्यात दारूची बाटली फोडून व दोरीने  गळा आवळून खून केला.  खुनाचा हा प्रकार सोमवारी रात्री इस्लामपूर-पेठ रस्त्यावरील एका गॅरेजमध्ये झाला.  मंगळवारी दुपारी तो उघडकीस आला. 

याप्रकरणी पोलिसांनी सुटीवर आलेल्या जवानासह एका संशयिताला अटक केली आहे. राहुल दिलीप तेवरे (वय 30) आणि जवान महेश हणमंत तेवरे (वय 32, दोघेही रा. इस्लामपूर) अशी त्यांची नावे आहेत. अमित  सोमवारी सायंकाळी घरातून बाहेर गेला होता. मंगळवारी सकाळपर्यंत तो घरी न आल्याने त्याच्या भावाने पोलिसांत तो बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी अमितच्या मोबाईल लोकेशनवरून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी इस्लामपूर-पेठ रस्त्यावर त्याच्या मोबाईलचे लोकेशन मिळून आले. दुपारी कापूरवाडीजवळील ओम साई गॅरेजच्या गच्चीवर अमित याचा मृतदेह आढळून आला. 

अमित याच्या डोक्यात खोलवर जखम झाली होती. बाजूला रक्त  पडले होते. तसेच शेजारी फुटलेल्या बिअरच्या बाटल्या व चकणाही पडला होता. त्यामुळे अमित याचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांनी सहकार्‍यांसह घटनास्थळाची पाहणी केली. अमितचा दोरीने गळा आवळून व डोक्यात वार करून खून झाल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे. अमित हा नोकरीनिमित्त शिराळा येथे स्थायिक होता. त्या ठिकाणी त्याने कापड दुकानही सुरू केले होते. दिवाळीला राहुलने अमितच्या दुकानातून 18 हजार रुपयांची तर महेशने 8 हजार रुपयांची कपडे खरेदी केली होती. हे उधारीचे पैसे या दोघांनी अमितला दिले नव्हते. त्यामुळे त्यांचे अधूनमधून खटके उडत होते. अमितने राहुलच्या वडिलांची मोटारसायकल काढून घेतली होती. त्याचा रागही या दोघांना होता. 

अमित सोमवारी इस्लामपूरमध्ये आला होता. सायंकाळी  अमित, महेश व राहुल तेवरे  एकत्र होते. त्यांची साई गॅरेजच्या स्लॅबवर उठ-बस असायची. सोमवारी हे तिघेही दारू प्यायला बसले होते. उधारीच्या पैसे  व राहुलच्या वडिलांची गाडी अमितने काढून घेतल्याच्या कारणावरून तिघांच्यात वाद झाला. या वादातून दारूची बाटली अमित याच्या डोक्यात फोडली.  अमितच्या डोक्यात खोलवर जखम झाल्याने रक्तस्त्राव जास्त झाला. नंतर दोरीने अमितचा गळा आवळला. तो ठार  झाल्याचे  पाहून  दोघांनी तेथून पळ काढला.

दरम्यान अमितच्या पत्नीने  सोमवारी रात्री 7.30 वाजण्याच्या सुमारास मोबाईलवर संपर्क केला होता.  त्यावेळी पती-पत्नींचे बोलणेही झाले होते. मात्र त्यानंतर रात्री उशिरापर्यंत अमितबरोबर संपर्क झालाच नाही. अमितचा भाऊ अमोलशी संपर्क साधून अमितचा मोबाईल लागत नसल्याचे पत्नीने सांगितले. वीरकर कुटुंबियांनी रात्री उशिरापर्यंत अमितचा शोध घेतला. परंतु तो मिळून आला नाही. त्यानंतर त्याचे मित्र महेश व राहुल यांच्याशी वीरकर कुटुंबीय संपर्क साधू लागले. परंतु त्यांचाही संपर्क होऊ शकला नाही. गॅरेजवर कुटुंबीय पोहोचले तेव्हा  स्लॅबवर अमित हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला.  काही तासातच संशयितांना पोलिसांनी जेरबंद केले.अमितच्या पश्‍चात पत्नी, लहान मुलगा, दोन भाऊ, आई-वडील असा परिवार आहे. अमितचे बंधू अमोल वीरकर यांनी  फिर्याद दिली आहे. निरीक्षक मानकर  तपास करीत आहेत. 

Tags : sangli, sangli news, young boy, murder, Islampur