Tue, Apr 23, 2019 18:27होमपेज › Sangli › चुकीच्या धोरणांचा बाजार समित्यांना फटका

चुकीच्या धोरणांचा बाजार समित्यांना फटका

Published On: Feb 25 2018 1:14AM | Last Updated: Feb 24 2018 11:04PMबोरगाव : वार्ताहर

राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणांचा राज्यातील बाजार समित्यांना मोठा फटका बसतो आहे. शासनाच्या या चुकीच्या धोरणांमुळे बाजार समित्यांचे उत्पन्न कमी होत आहे, असा आरोप आमदार जयंत पाटील यांनी केला.

ताकारी (ता. वाळवा) येथे विकासकामांच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.  आमदार पाटील म्हणाले, ताकारी रस्त्याच्या रुंदीकरणाने गावचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे तो रस्ता गावाच्या बाहेरून घेण्यासाठी आम्ही विविध पातळीवर प्रयत्न  करीत आहोत. बाजार समितीमध्ये शेतीमाल विकण्यास राज्य शासनाने सेस लावल्याने बरेच शेतकरी बाजार समित्यांच्या बाहेर शेतीमाल विकत आहेत. त्यामुळे बाजार समित्यांचे उत्पन्न कमी होत आहे. तसेच बर्‍याच वेळा व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांची फसवणूक केली जात आहे. ही फसवणूक टाळण्यासाठी शेतकर्‍यांनी आपला शेतीमाल बाजार समित्यांच्या आतच विकायला हवा.

विलासराव शिंदे म्हणाले, इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीने व्यापारी, शेतकर्‍यांच्यासह सर्व घटकांना विश्‍वासात घेऊन प्रभावी काम केले आहे. राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील म्हणाले, नवीन वास्तूने आमच्या गावाच्या सौंदर्यात भर पडली आहे. 

इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीने ताकारी येथील उप बाजारच्या आवारात बांधलेली  दोन सभागृहे व विविध विकास कामांचे आमदार पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले.  राज्य बँकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजय पाटील, माजी जि.प.अध्यक्ष देवराज पाटील, सभापती आनंदराव पाटील, उपसभापती सुरेश गावडे, सरपंच अर्जुन पाटील, उपसरपंच रवींद्र पाटील उपस्थित होते. सभापती आनंदराव पाटील यांनी प्रास्ताविक केले.  दिलीपराव देसाई यांनी स्वागत केले.  संचालक संदीप पाटील यांनी आभार मानले.