Mon, Apr 22, 2019 05:42होमपेज › Sangli › एसटी कामगारांचे नेते बिराज साळुंखे यांचे निधन

एसटी कामगारांचे नेते बिराज साळुंखे यांचे निधन

Published On: Jul 05 2018 10:23AM | Last Updated: Jul 05 2018 10:23AMसांगली : प्रतिनिधी

एसटी कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष आणि राज्यातील असंघटीत कामगारांचे नेते बिराज साळुंखे (वय ८०) यांचे बुधवारी मध्यरात्री येथे निधन झाले. गेले काही दिवस ते मेंदुरोगावरील उपचार घेत होते.

मुंबईत विद्यार्थी दशेत असताना कॉ. एस. ए. डांगे, एस. एम. जोशी यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी गिरणी कामगार संघटनेत कार्य केले होते. पुढे ते सांगलीला परतले आणि इथले हमाल व इतर असंघटीत कामगारांसाठी झटू लागले. मोलकरणी, काच पत्रा गोळा करणारे, अंगणवाडी सेवक अशा सामान्य असंघटीत वर्गासाठी ते आयुष्यभर झटले. एसटी कामगार संघटनेच्या कार्यासाठी ते या वयातही गेल्या महिन्यापर्यंत राज्यभर प्रवास करीत होते. सीमाप्रश्नाच्या मुद्यावर काँग्रेस पक्षाच्या सचिव पदाचा त्याग करुन ते सीमा आंदोलनात अग्रभागी राहिले. सांगली जिल्ह्यात हा प्रश्न जागृत ठेवण्यात तसेच बेळगाव जिल्ह्यात अनेक आंदोलनात त्यांनी कारावासही सोसला होता.

बिराज साळुंखे यांचे पार्थिव  ९ वाजता अंत्यदर्शनासाठी रामकृष्णनगर येथील त्यांच्या निवासस्थानी, त्यानंतर एसटी विभागीय कार्यालयात ठेवण्यात येणार आहे त्यानंतर अंत्ययात्रा निघणार आहे.