Mon, Aug 19, 2019 01:22होमपेज › Sangli › खासदार निधीतील कामे नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा

खासदार निधीतील कामे नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा

Published On: Sep 05 2018 2:14AM | Last Updated: Sep 04 2018 10:57PMसांगली : प्रतिनिधी 

खासदार निधीतून मंजूर कामे नोव्हेंबरअखेर पूर्ण करा. जी अपूर्ण आहेत ती तातडीने पूर्ण करा, असे आदेश खासदार संजय पाटील यांनी  मंगळवारी येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांतील अधिकार्‍यांची बैठक झाली. त्यात त्यांनी खासदार निधीतील कामांचा आढावा घेतला. 

यावेळी  आमदार मोहनराव कदम,  अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, जिल्हा नियोजन अधिकारी ज. द. म्हेत्रे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार आदि उपस्थित होते. 

गेल्या पाच वर्षांत खासदार निधीतील 25 कोटींपैकी सुमारे 18 कोटींच्या 336 कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सुमारे 13 कोटी रुपयांपैकी 11 कोटी 209 कामांवर खर्च झाले आहेत. सध्या 107 कामे सुरू आहेत. वीस कामे अद्याप सुरू झालेली नाहीत. ही माहिती जिल्हा नियोजन अधिकारी म्हेत्रे यांनी दिली. 

विभागनिहाय कामाचा आढावा घेण्यात आला. अपूर्ण किंवा सुरू नसलेल्या कामांची माहिती संबंधीत विभागातील अधिकार्‍यांकडून घेतली. अनेक अधिकार्‍यांनी प्रस्ताव तयार केले नसल्याचे, कागदपत्रे अपूर्ण असल्याचे यावेळी स्पष्ट झाले. विशेषतः क्रीडा विभागाची अनेक कामे अपूर्ण आहेत.  त्यामुळे खासदार पाटील यांनी कागदपत्रांची पूर्तता करून कामे लवकरात लवकर पूर्ण करा, असे सांगितले. खासदार पाटील यांनी जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या कामांची माहितीही घेतली.