Wed, Mar 20, 2019 23:04होमपेज › Sangli › आमदार फंडातील कामांना मनपा, बांधकामचा अडसर

आमदार फंडातील कामांना मनपा, बांधकामचा अडसर

Published On: Jun 11 2018 1:08AM | Last Updated: Jun 10 2018 10:58PMसांगली : प्रतिनिधी

आमदार सुधीर गाडगीळ यांच्या आमदार फंडातील  सुमारे दोन कोटी रुपयाची विविध विकास कामे महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संथ कारभारामुळे रेंगाळी आहेत. महापालिकेने अनेक कामांना अद्याप ना हारकत प्रमाणपत्र दिलेले नाही तर बांधकाम विभागाने काही कामांचे अंदाजपत्रक तयार केलेली नाहीत. दरम्यान, महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागणार आहे. त्या आगोदर या कामांचे प्रस्ताव तयार होऊन त्याला जिल्हा नियोजन विभागाची मंजुरी मिळणे गरजेचे आहे. 

सरकारी काम आणि सहा महिने थांब, या म्हणीचा प्रत्यय आमदार गाडगीळ यांच्या फंडातील कामाबाबत सध्या प्रशासनाकडून येत आहे. आमदार गाडगीळ यांनी त्यांच्या फंडातून मतदारसंघात विविध विकास कामे करण्याबाबतचे पत्र जिल्हा नियोजन मंडळाकडे दीड महिन्यापूर्वीच दिले आहे. त्यानंतर नियोजन मंडळाने त्याला मंजुरी देत हे प्रस्ताव बांधकाम विभागाकडे देण्यात आले. बांधकाम विभागाने सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेसह संबंधित विभागाकडे ना हरकत प्रमाणपत्राची मागणी केली. ना हरकत प्रमाणपत्र देण्याबाबत महापालिकेकडून दिरंगाई होत आहे. शहराच्या अनेक विस्तारित भागात  महापालिका स्वतः काही काम करीत नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांनी आमदारांच्या फंडातून ही कामे तातडीने करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

मात्र त्याला महापालिकेतील बाबूशाही अडसर ठरत आहे. एकाबाजूला पैसा नाही, म्हणून कामे होत नाहीत, तर दुसर्‍याबाजूला निधी असूनही कामात दिरंगाई होताना दिसत आहे. पलूस- कडेगाव विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूक आचारसंहितेमुळे कामे खोळंबली होती. ती आचारसंहिता संपल्यानंतर कामे लवकर होतील, अशी अपेक्षी होती. आता महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागणार आहे. त्या आगोदर या कामांचा आराखडा, प्रस्ताव तयार करून नियोजनची मंजुरी घेणे गरजेचे आहे. अन्यथा पुन्हा ही कामे दीड महिने रखडण्याचा धोका आहे. 

लोकांच्या कामांना प्राधान्य देणे गरजेचे : आ. गाडगीळ

लोकांच्या विकासकामांसाठी शासन निधी खर्च करीत आहे. हा निधी वेळेत खर्च होणे गरजेचे आहे. कामे करीत असताना अगोदर लोकांच्या कामांना अधिकार्‍यांनी प्राधान्य देणे गरजेचे आहे. कामांना लवकरच मंजुरी मिळेल. कामात हालगर्जीपणा आणि अडसर करणार्‍यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे आमदार सुधीर गाडगीळ यांनी सांगितले.