Sat, Dec 14, 2019 04:35होमपेज › Sangli › पोटच्या मुलीला घेवून महिलेची विहिरीत उडी मारून आत्‍महत्‍या

पोटच्या मुलीला घेवून महिलेची विहिरीत उडी मारून आत्‍महत्‍या

Published On: Aug 13 2019 8:51PM | Last Updated: Aug 13 2019 8:51PM

file photoतासगाव : शहर प्रतिनिधी

शहरातील साठेनगर येथे भिलवडी बायपास पुलाखाली असणार्‍या विहिरीत लमाणकाम करणार्‍या महिलेने तिच्या दीड वर्षाच्या मुलीसह उडी घेवून आत्महत्या केली. आरती सचिन राठोड (वय 21, रा. राजनाल तांडा, विजापूर) व तिची मुलगी अंजिना अशी मृतांची नावे आहेत. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  

घरामध्ये पती पत्नीमध्ये सुरू असलेल्या वादातून हा प्रकार झाला असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. याबाबत तासगाव पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार मंगळवारी सकाळी पती सचिन हा आरतीला कामावर चल म्हणाला, मात्र आरतीने तब्येत ठिक नसल्यामुळे कामावर येणार नसल्याचे सांगितले. यावरुन त्या दोघांमध्ये वाद झाला. सचिन कामावर निघून गेला. दरम्यान सकाळी दहाच्या सुमारास आरती तिची मुलगी अंजिनाला घेवून साठेनगर येथील भिलवडी बायपास रस्त्यावरील पुलावर आली व मुलीला घेवून थेट विहिरीत उडी मारली. आरतीचा मृतदेह त्वरीत मिळाला मात्र अंजिनाचा मृतदेह पाण्याखाली गेल्याने पोलिसांनी रेस्‍क्‍यु पथकाला पाचारण केले. यानंतर अंजिनाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेचा अधिक तपास तासगाव पोलिस करीत आहेत.