होमपेज › Sangli › महिला चोरट्यांच्या टोळीने फोडले धान्याचे गोडाऊन

महिला चोरट्यांच्या टोळीने फोडले धान्याचे गोडाऊन

Published On: Aug 21 2018 3:06PM | Last Updated: Aug 21 2018 3:06PMकराडः प्रतिनिधी 

शहरातील शनिवार पेठेतील मार्केट यार्ड परिसरात असलेले धान्याचे गोडावून महिला चोरट्यांच्या टोळीने फोडल्याने खळबळ उडाली आहे. या महिलांच्या टोळीने सुमारे सव्वा लाख रुपयांची धान्याची ९५ पोती गायब केली आहेत. शनिवार दि.२१ रोजी सकाळी ही बाब समोर आली. या चोरीप्रकरणी आठ ते दहा महिलांच्या टोळीवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

याबाबत पोलिसांनी सांगितले की, शहरातील हेमंत ट्रेडिंग कंपनीचे मालक हेमंत जयराम ठक्कर यांचे सुर्या कॉम्प्लेक्स, दत्त चौक येथे धान्याचे दुकान आहे. त्यांच्या मालकीचे रेस्ट हाऊस बिल्डींग गोडाऊन नं. २ मार्केट यार्ड गेट नंबर २ येथे धान्याचे गोडाऊन आहे. शनिवार दि. १८ रोजी ते गोडावूनचे शटर बंद करून घरी गेले. त्यानंतर ते मंगळवार दि. २१ रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी मार्केट यार्ड परिसरात गेले. त्यावेळी गोडाऊन पाठीमागील बाजूस काही महिलांची हालचाल त्यांना दिसली. त्यांनी पाहिले असता अनोळखी आठ ते दहा महिला तेथून पळून जाताना दिसल्या. त्यानंतर त्यांनी गोडाऊनचा मुख्य दरवाजा उघडून आत जाऊन पाहिले असता गोडाउन मधील गहू, तांदूळ व ज्वारीची पोती अस्ताव्यस्त पडली होती. गोडाऊनच्या पाठीमागील भिंतीजवळ महिलांच्या चपलांचे चार जोड पडले होते. त्यामुळे आपले गोडाऊन फोडून महिलांनीच गोडाऊनमधील धान्याची पोती चोरून नेल्याची हेमंत ठक्कर यांची खात्री पटली. याबाबतची माहिती त्यांनी शहर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत चोरीचा पंचनामा केला. 

महिला चोरट्यांच्या टोळीने गोडाऊनमधील गव्हाची ३० किलोची दहा पोती, तसेच तांदळाची २५ किलोची ८५ पोती तसेच ज्वारीची काही पोती नेली आहेत. याशिवाय अल्युमिनियमची शिडीसह सुमारे २ लाख २३ हजार रुपयांची धान्याची पोती महिला चोरट्यांच्या टोळीने चोरून नेली. याबाबतची फिर्याद हेमंत ठक्कर यांनी शहर पोलिसात दिली आहे. पोलिसांनी आठ ते दहा महिलांच्या टोळीवर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिवराम खाडे करत आहेत.