Mon, Apr 22, 2019 23:41होमपेज › Sangli › पलूस वाईन पार्कला उर्जितावस्था मिळणार का?

पलूस वाईन पार्कला उर्जितावस्था मिळणार का?

Published On: Aug 24 2018 12:47AM | Last Updated: Aug 23 2018 10:48PMसांगली : प्रतिनिधी

नाशिकमधील वाईन उद्योगाला उत्पादन शुल्क माफ करुन सरकारने दिलासा दिला आहे. त्याप्रमाणे सांगली जिल्ह्यातील पलूस येथील वाईन पार्कला शासनाने मदत करून उर्जितावस्था देण्याची गरज आहे. याठिकाणी असणार्‍या वाईन औद्योगिक वसाहतीत द्राक्ष निर्यात केंद्राला जागा देण्याची आवश्यकता आहे. 

माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी कृषी-औद्योगिक क्रांतीला चालना देण्यासाठी पलूसमध्ये वाईन पार्कची स्थापना केली. त्यासाठी 90 हून अधिक एकर जमीन सांडगेवाडी येथे संपादित केली. त्याठिकाणी 80 च्या आसपास प्लॉट पाडून ते वाईनची द्राक्षे लावून उद्योजक होणार्‍या शेतकर्‍यांना देण्यात आले. यामुळे  पलूस, तासगाव, मिरज तालुक्यात एक हजार एकरांवर द्राक्षबाग लावण्यात आली. 

हा सर्व प्रकल्प अंतिम टप्प्यात आला होता. पण  अचानक सर्व प्रक्रिया थांबली. यामुळे वाईनची द्राक्षे लावलेल्या शेतकर्‍यांना लाखो रुपयांचा फटका बसला. तसेच काही प्रमाणात मशिनरी व प्लॉट तसेच धूळ खात पडले आहेत. गेल्या दहा-बारा वर्षांपासूनची ही स्थिती आहे.

मात्र नाशिकमध्ये काही शेतकर्‍यांनी मोठ्या हिंमतीने वाईन उद्योग यशस्वी करून दाखविला आहे. परंतु या उद्योगाला काही प्रमाणात अडचणी येत होत्या. याबाबत तेथील उद्योजकांकडून शासनाकडे पाठपुरावा सुरू होता. याची दखल घेत शासनाने 118 कोटी रुपयांचे उत्पादन शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नाशिकमधील वाईन द्राक्ष उत्पादक तरले आहेत. 

या पध्दतीनेच पलूस वाईन पार्कला उर्जितावस्था देण्याची गरज आहे. येथील निम्मी जागा वाईन उद्योग व उर्वरित जागेत द्राक्ष निर्यात केंद्र उभा केल्यास जिल्ह्यातील द्राक्ष शेतीला मोठी चालना मिळू शकते. यासाठी लोकप्रतिनिधींनीही पाठपुरावा करण्याची आवश्यकता आहे.