Sat, Aug 24, 2019 19:39होमपेज › Sangli › दुधगावात शहीद कोळींचे स्मारक कधी होणार?

दुधगावात शहीद कोळींचे स्मारक कधी होणार?

Published On: Jan 26 2018 1:16AM | Last Updated: Jan 25 2018 8:44PMसमडोळी : वार्ताहर

दुधगाव (ता. मिरज) येथील वळण रस्त्यावरील खण मुजवून त्याठिकाणी क्रीडासंकुलाबरोबरच शहीद नितीन कोळी यांचे स्मारक उभे करावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. 
दुधगाव येथे असलेल्या खणीमुळे आरोग्याबरोबरच अपघाताचा धोका वाढत चालला आहे. खणीभोवती संरक्षण भिंत नसल्याने पाणी साचून राहिले आहे. त्यामुळे पाण्यात जलपर्णी वाढलेली आहे. त्यामुळे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. खण मुजविण्यासाठी आमदार जयंत पाटील यांच्या स्थानिक विकास निधीसह 25-15 योजनेतून प्रयत्न करण्यात आले आहेत. परंतु तेही काम अपूर्ण असल्याने उर्वरित निधीसाठी पाठपुरावा करण्याची गरज आहे.

जिल्हाधिकारी विजयकुमार काळम - पाटील व आमदार जयंत पाटील हे दोन महिन्यांपूर्वी दुधगाव येथे शहीद नितीन कोळी यांच्या प्रथम  पुण्यस्मरण दिनाच्या कार्यक्रमानिमित्त आले होते. त्यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी नितीन कोळी यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त खण मुजवून या ठिकाणी क्रीडासंकुल बांधू तसेच शहीद कोळी यांचे स्मारक बांधून द्वितीय पुण्यस्मरणाचा कार्यक्रम करू, असा शब्द दिला होता. तथापि  याबाबत अद्याप कोणतीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या आश्‍वासनानुसार काम सुरू व्हावे, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.