Wed, Aug 21, 2019 14:45होमपेज › Sangli › नेतृत्वाअभावी पश्‍चिम महाराष्ट्र रेल्वे प्रकल्पाच्या प्रतीक्षेत

नेतृत्वाअभावी पश्‍चिम महाराष्ट्र रेल्वे प्रकल्पाच्या प्रतीक्षेत

Published On: Feb 03 2018 2:15AM | Last Updated: Feb 02 2018 10:59PMमिरज : प्रतिनिधी

नेतृत्वाअभावी पश्‍चिम महाराष्ट्रात रेल्वेचा कोणताही मोठा प्रकल्प (डबे निर्मिती कारखाने, रेल नीर) येत नसल्याची टीका रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष किशोर भोरावत यांनी केली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी मांडलेल्या अर्थसंकल्पात पश्‍चिम महाराष्ट्रातील जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार केला आहे. रोजगार निर्मिती करणारा एकही प्रकल्प देण्यात आलेला नाही. लातूरसारख्या ठिकाणी रेल्वे डबे तयार करण्याचा कारखाना दिला जातो. तर मिरजसारख्या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध असतानाही प्रकल्प देण्याकडे  दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोपही भोरावत यांनी केला.

ते म्हणाले,  पुणे - मिरज - लोंढा विद्युतीकरणासह दुहेरीकरण करण्याची जुनी मागणी होती. ही मागणी सुरेश प्रभू रेल्वे मंत्री असताना पूर्ण करण्यात आली. प्रत्यक्षात कामासही सुरुवात झाली आहे. मिरज येथून कोल्हापूर, बेळगाव, पंढरपूर आणि पुणेकडे जाणारे चार रेल्वेमार्ग एकत्र येतात. येथे पाण्याचीही मुबलकता आहे.   रेल्वेची स्वतंत्र नळपाणी पुरवठा योजना आहे. जमीन आहे. कर्नाटक सीमेलगत असलेल्या मिरजेत सर्व सुविधा सहज उपलब्ध असतानाही केवळ प्रभावी नेतृत्व नसल्याने रेल्वे विकासाबरोबर पश्‍चिम महाराष्ट्र मागे पडला आहे.  

रेल नीर प्रोजेक्टसाठी प्रयत्न

मिरज येथे रेल नीर प्रोजेक्ट उभारण्यासाठी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला होता.  परंतु यावर्षीच्या अंदाजपत्रकात याबाबत घोषणा झाली नाही. भविष्यकाळात या प्रकल्पासाठी प्रयत्न करणार असल्याचे मिरज रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष मकरंद देशपांडे यांनी सांगितले.

रेल्वेचा स्वतंत्र विभाग करावा

दुहेरीकरणामुळे मिरज जंक्शनचे महत्त्व वाढेल. या ठिकाणी रेल्वेचे विभागीय कार्यालय व्हावे. त्यामुळे प्रशासनाच्यादृष्टीने आणि प्रस्तावित रेल्वेमार्गासाठी  सोयीचे होणार आहे, असे मिरज रेल्वे कृती समितीचे सचिव सुकुमार पाटील यांनी सांगितले.