Tue, Jul 23, 2019 10:30होमपेज › Sangli › पाण्यासाठी सांगलीत ‘शोले स्टाईल’ आंदोलन

पाण्यासाठी सांगलीत ‘शोले स्टाईल’ आंदोलन

Published On: Jan 13 2018 1:14AM | Last Updated: Jan 12 2018 10:21PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

येथील शामरावनगर, गुलाब कॉलनी, हनुमाननगरसह पाणीप्रश्‍न गंभीर आहे. त्याबाबत वारंवार तक्रारी करूनही दखल न घेतल्याबद्दल नगरसेवक राजू गवळी यांनी आक्रमक पवित्रा घेतला. गुलाब कॉलनीत बांधून पूर्ण असलेल्या 80 फूट पाणी टाकीवरच चढून त्यांनी ‘शोले स्टाईल’ आंदोलन केले. 

‘पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे’, अशा घोषणाही देण्यात आल्या. कार्यकारी अभियंता शीतलनाथ उपाध्ये यांना घेराओही घालण्यात आला. अखेर येत्या चार दिवसांत या परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

याबाबत गवळी म्हणाले, सांगली शहरातील गुलाब कॉलनी, त्रिमूर्ती कॉलनी, शंभरफुटी रस्ता, रामकृष्ण परमहंस सोसायटी या परिसरात गेल्या सात दिवसांपासून अपुरा पाणीपुरवठा होत आहे. उपअभियंता संजय धर्माधिकारी यांना वारंवार सांगूनही पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही. धर्माधिकारी यांनी दुर्लक्ष केल्यानेच आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला.  आंदोलनाची माहिती मिळताच उपाध्ये आंदोलनस्थळी आले. त्यांनी नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अखेर उपाध्ये स्वत:च पाण्याच्या टाकीवर चढले. तिथे नगरसेवक गवळी व नागरिकांची समजूत काढून त्यांना खाली आणले.

गळती, स्वच्छतेच्या कामामुळे  अपुरा पुरवठा 
श्री. उपाध्ये म्हणाले, महापालिकेने हिराबाग, जलभवन येथील पाण्याच्या टाकीच्या स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे. हिराबाग येथील दुरुस्तीचे काम 19 तास चालले. त्यानंतर नदीकाठावरील जॅकवेलच्या वाहिनीला गळती लागली.   त्यामुळे गुलाब कॉलनीतील पाण्याची टाकी पूर्ण क्षमतेने भरू शकली नाही. टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. शिवाय 70 एमएलडी जलशुद्धिकरण केंद्र कार्यान्वित झाल्यानंतर ही समस्या कायमची संपेल. परिसरातील पाणीपुरवठ्याकडे दुर्लक्ष केल्याने संजय धर्माधिकारी यांना नोटीसही बजावू.