Sun, Mar 24, 2019 06:12होमपेज › Sangli › ओढ्यावरील बंधारे ठरत आहेत वरदान

ओढ्यावरील बंधारे ठरत आहेत वरदान

Published On: Feb 11 2018 12:57AM | Last Updated: Feb 10 2018 9:18PMमाहुली : संतोष पवार

जलयुक्त शिवार मोहिमेंतर्गत ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ यासाठी खानापूर तालुक्यातील जवळजवळ प्रत्येक गावात ओढ्यावर बंधारे बांधण्यात आले आहेत. या बंधार्‍यात पाणीसाठा होत असल्याने त्याचा शेतीसाठी उपयोग होत आहे. परिसरात टेंभूचे पाणी आल्याने सध्या बंधारे पाण्याने भरले  आहेत. त्यामुळे शिवारातील शेती बहरू  लागली आहे.

राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेंतर्गत ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ कार्यक्रमांतर्गत प्रत्येक गावात ओढे, नाले यावर बंधारे बांधण्यात आले आहेत. या बंधार्‍यांचा फायदा होत आहे. पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी त्यात अडविले जात आहे.

या परिसरात टेंभू योजनेचे पाणी आले  आहे. त्यामुळे हे बंधारे सध्या भरुन वाहत आहेत. या पाण्यावर परिसरात बागायत क्षेत्र वाढले आहे.  शेतीला या बंधार्‍यातील पाण्याचा मोठा फायदा होताना दिसत आहे. 
बंधार्‍यात पाणीसाठा होत असल्याने कूपनलिका, विहिरी यांच्याही पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सध्या तरी निकालात निघाला आहे. पाणी अडविल्याने शेतीबरोबरच पूरक व्यवसायांनाही मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे. उसाबरोबरच भाजीपाला शेती परिसरात बहरू लागली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे  अंदाजपत्रक नेटके झाल्याचे दिसून येत आहे.

खानापूर तालुक्यात कृषी विभागाच्या जलयुक्त शिवार योजनेतून मोठ्या प्रमाणात बंधारे बांधण्यात आले आहेत. तसेच या बंधार्‍यांतील गाळ काढल्याने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. सध्या टेंभू योजनेचे पाणी माहुली येथील टप्पा क्रमांक 3 मधून पोट कालव्याने माहुली, वलखड, चिखलहोळ, नागेवाडी, भाग्यनगर या परिसरातील ओढ्यांना त्याचा फायदा झाला आहे. गावातील कूपनलिकांची पाणीपातळी वाढली आहे. बंधार्‍यापासून  एक किलोमीटरपर्यंत पाणी संचयन पातळी वाढते आहे. बंंधार्‍यात आजही पाणी साठून आहे.