Sun, May 31, 2020 11:26होमपेज › Sangli › सांगली :घरे, बाजारपेठा उभ्या करण्याचे आव्हान

सांगली : घरे, बाजारपेठा उभ्या करण्याचे आव्हान

Published On: Aug 14 2019 11:24PM | Last Updated: Aug 15 2019 8:55AM
सांगली : प्रतिनिधी 

कृष्णा आणि वारणा नद्यांचे पाणी आता पात्रात गेले आहे. सांगलीत कृष्णेची पातळी आयर्विन पुलाजवळ झपाट्याने कमी होत आहे. बुधवारी रात्री ती 39 फूट 6 इंच  म्हणजे इशारा पातळी (40 फूट) च्याही खाली गेली होती. त्यामुळे तब्बल आठ ते नऊ दिवस महापुराच्या विळख्यात सापडलेल्या सांगलीला थोडा दिलासा मिळाला आहे; परंतु आता कोसळलेली सांगली आणि जिल्ह्यातील चार तालुक्यांतील अनेक पूरग्रस्त गावे पुन्हा ताकदीने उभे करायचे आव्हान प्रशासन आणि नागरिकांसमोरही उभे ठाकलेले आहे.

मिरज-कर्नाटक मार्गावरील वाहतूक अद्याप बंदच आहे.  सांगली- कोल्हापूर, सांगली-मुंबई बसवाहतूक मात्र  सुरू झाली आहे. दरम्यान, पलूस आणि मिरज तालुक्यांतील काही गावांत अद्यापही पुराचे पाणी तळ ठोकून आहे. सांगली शहरातील मारुती चौक आणि छत्रपती शिवाजी मंडई परिसरातही सायंकाळपर्यंत पाणी होते.

कृष्णा नदीने या खेपेस पाणी पातळीचे आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले. आयर्विन पुलाजवळ 58 फुटांपर्यंत पाणी पातळी पोहोचली होती. धोक्याच्या पातळी (45 फूट) पेक्षा तेरा फूट अधिक अशी ती पाणी पातळी होती. त्यामुळे शहरात आणि परिसरातील सांगलीवाडी, हरिपूर, धामणी, अंकली, उदगाव, नांद्रे, कर्नाळ आदी गावांत महापुराने हाहाकार उडवला होता. संपूर्ण जनजीवन ठप्प झाले होते. 

कृष्णा पात्रात गेली आणि वारणेचा पूर ओसरल्यानंतर लोकांना हायसे वाटले. ज्या-ज्या भागात पाणी शिरले होते, तिथे लोक आणि व्यापारी परतले. त्यांनी आता घरांची आणि दुकानांची साफसफाई सुरू केली आहे. घरातील संसारोपयोगी साहित्याचे अतोनात नुकसान झाले आहे. घरांना तडाखा बसला आहे. बाजारपेठेतील दुकानांत बहुसंख्य दुकानांत पाणी शिरले होते. त्या दुकानांतील  सगळा माल खराब झाला आहे. फर्निचरचेही वाटोळे झाले आहे. भिंतींना तडे  गेले आहेत. त्यामुळे आज दिवसभर साफसफाई करून नंतर डागडुजीचे प्रयत्न लोकांनी सुरू केले आहेत. सायंकाळी शहर आणि परिसरात पुन्हा एकदा पाऊस झाला. त्यामुळे घरे आणि दुकाने यांच्या साफसफाईच्या कामात अडथळा आला. घराच्या किंवा दुकानांच्या बाहेर सफाईसाठी काढलेले साहित्य पुन्हा भिजले. 

पूरग्रस्त भागातील घरे आणि दुकाने यांतील साहित्य आणि माल बाहेर काढून टाकल्यामुळे रस्तोरस्ती सगळीकडे ढीगच्या ढीग दिसत आहेत. तो सगळा कचरा हलवण्याचे मोठे आव्हान आता महापालिका आणि मदतीला आलेल्या यंत्रणांसमोर आहे. वीज वितरण कंपनीने गेल्या दोन दिवसांत बहुसंख्य ठिकाणी महत्प्रयासाने वीजपुरवठा पुन्हा सुरू केला आहे. तसेच महापालिकेने पाण्यात बुडालेली जॅकवेल दुरुस्त करून तिथे वीजपुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे बहुतांश भागातील नळपाणीपुरवठाही आता क्रमाक्रमाने पूर्वपदावर येत आहे. 

शासनातर्फे शहरी भागात पूरग्रस्त कुटुंबाला प्रत्येकी 15 आणि ग्रामीण भागात 10 हजार रुपये तातडीची मदत जाहीर झाली आहे. शासनाच्या निर्णयानुसार सध्या सर्वत्र रोखीने पाच हजार रुपये देण्याचे काम सुरू झाले आहे. तसेच सबंधित कुटुंबप्रमुखाचा बँक खातेक्रमांक नोंदवून घेण्यात येत आहे. त्या बँक खात्यात नंतर उर्वरित मदत जमा केली जाणार आहे. राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर खाद्यपदार्थ आणि जीवनावश्यक वस्तू यांची मदत येत आहे. मात्र नुकसान एवढे प्रचंड आहे, की कितीही मदत आली तरी सगळे संसार आणि सगळ्या बाजारपेठा पुन्हा उभ्या करायचे फार मोठे आव्हान आहे.