Tue, May 21, 2019 04:07होमपेज › Sangli › एकजुटीने पेटलं रान...तुफान आलंया...

एकजुटीने पेटलं रान...तुफान आलंया...

Published On: Apr 15 2018 11:02PM | Last Updated: Apr 15 2018 10:45PMतासगाव : प्रतिनिधी

उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात आणि तहसीलदार सुधाकर भोसले यांच्या पुढाकारामुळे तासगाव तालुक्यात श्रमदानाचं तुफान आलयां. पानी फाऊंडेशनची वॉटर कप स्पर्धा 49 गावांसाठी चळवळ बनली आहे. जलसंधारणासाठी तरुण पिढी, वयोवृद्ध आणि महिला यांच्या बरोबरीने बालचमू एकजुटीने कामाला लागला आहे. 

सावळजमधील तरुण पिढी गट-तट विसरुन अगोदर पासूनच कामाला लागली होती. त्यांचा आदर्श घेऊन तालुक्यातील इतर 48 गावांनी स्पर्धेत सहभाग घेतला आहे. 8 एप्रिलपासून वॉटर कप स्पर्धा सुरू झाली असून ती 22 मे पर्यंत चालणार आहे. काही गावांनी 7 एप्रिलच्या मध्यरात्रीच श्रमदानाला सुरुवात केली. 

   जलसंधारणाच्या कामासाठी लोकांना प्रेरणा मिळावी, यासाठी उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात आणि तहसीलदार सुधाकर भोसले यांनी चांगलाच पुढाकार घेतला आहे. हे दोघे रोज पहाटे एका गावात श्रमदानाच्या कामावर हजर असते. यामुळे गावपुढारीसुद्धा श्रमदानात सहभागी होत आहेत.

जलसंधारणासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. गावकर्‍यांनी यासाठी स्वःताला झोकून दिले आहे.  ‘पाणी अडवा पाणी जिरवा’  ही संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी ते अहोरात्र झटत आहेत. वॉटर कप स्पर्धेसाठी गावोगावी हजारो रोपांची रोपवाटिका बनवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.