होमपेज › Sangli › सांगली : महाराष्ट्र दिनानिमित्त तासगावात 'महाश्रमदान' (video)

सांगली : महाराष्ट्र दिनानिमित्त तासगावात 'महाश्रमदान' (video)

Published On: May 01 2018 11:34PM | Last Updated: May 01 2018 11:34PMमांजर्डे : वार्ताहर

महाराष्ट्र दिनी १ मे रोजी तासगाव तालुक्यातील बस्तवडे व सावळज या गावामध्ये शिवार पाणीदार करण्यासाठी हजारो जलमित्रांचे हजारो हात राबले. यामुळे तालुक्यातील गावाना वॉटर कप स्पर्धेसाठी प्रोत्साहन मिळाले. निमित्त मात्र महाश्रमदान ठरले. जलमित्रांच्या तुफानामुळे तालुक्यातील गावाना एक आदर्श मिळाला आहे.

तासगाव गालुक्यातील सावळज, बस्तवडे या गावामध्ये १ मे रोजी महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले होते. सावळज येथे सकाळी ६ ते १० व बस्तवडे येथे सायंकाळी ३ ते ७ पर्यंत महाश्रमदान आयोजित केले होते. हजारो जलमित्रांच्या सहभागामुळे महाश्रमदान पार पडले.

मागील ४ दिवसांपासून महाश्रमदानाची जोरदार तयारी सुरू केली होती. यासाठी राज्यभरातून हजारो जलमित्रांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. ग्रामस्थांच्या बरोबरीने शासकीय यंत्रणासुद्धा या नियोजनात होती. कोठे कोणते काम करायचे याची सर्व माहिती घेऊन काम करण्याच्या ठिकाणी आखणी सुद्धा करण्यात आली होती. त्यासाठी लागणारे साहित्यसुद्धा आणण्यात आले होते. येणाऱ्या जलमित्रांसाठी पाणी, मठ्ठा, जेवण यांची उत्तम सोय करण्यात आली होती.

पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार जलमित्रांनी सावळज व बस्तवडे मध्ये येऊन श्रमदान केले. एक दिवस पाण्यासाठी या उद्देशाने राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या जलमित्रांनी श्रमदान केले. त्यांच्या बरोबरीला नियोजनासाठी गावचे ग्रामस्थ होतेच परंतु श्रमदानासाठी गावातील लहान मुले, मुली, महिला, तरुण, वयोवृद्ध व अपंग व्यक्तीसुद्धा यामध्ये हिरीरीने सहभागी झाले होते.

रखरखत्या उन्हात श्रमदान

सावळज व बस्तवडे गावामध्ये जलमित्रांनी रखरखत्या उन्हाची पर्वा न करता श्रमदान केले. काम करताना घामाच्या धारा वाहत होत्या तरी सुद्धा न डगमगता श्रमदान केले. याचे कौतुक सर्वत्र होत आहे. तालुक्यातील ग्रामस्थानीसुद्धा यांच्या या श्रमदानास दाद दिली. श्रमदान करताना सुरू असलेल्या परस्परांच्या चर्चेतून जलमित्रांना आनंद वाटत होता. श्रमदानानंतर आजचा दिवस अविस्मरणीय गेल्याची भावना अनेक जलमित्रांनी व्यक्त केली. महाश्रमदानासाठी महिला वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता.

चार तासात उभारले आदर्श काम

महाश्रमदानासाठी आलेल्या जलमित्रांनी चार तास श्रमदान करून तालुक्यातील गावांसमोर एक आदर्श काम उभारले आहे. या कामामुळे तयार करण्यात आलेल्या सीसीटीमुळे लाखो लिटर पाणी अडवले जाणार असून त्याचा लाभ ग्रामस्थांना होणार आहे.

सांगली, मिरज, कोल्हापूर, गडहिंग्लज, मुंबई, पुणे, इचलकरंजी, या ठिकाणाहून अनेक जलमित्रांनी उत्स्फूर्तपणे महाश्रमदानात सहभाग घेतला.