Tue, Jun 18, 2019 20:18होमपेज › Sangli › नदीकाठच्या गावांत पाण्याचा नवा धंदा

नदीकाठच्या गावांत पाण्याचा नवा धंदा

Published On: May 11 2018 2:16AM | Last Updated: May 10 2018 8:48PMबोरगाव : विजय शिंदे

वाळवा तालुक्यातील नदीकाठच्या गावांत दूषित पाण्यामुळे वाढणारी साथीचे आजार याची ग्रामस्थांनी धास्तीच घेतली आहे. आरोग्याच्या काळजीसाठी गावोगावी आता अनेक ग्रामस्थ मिनरल वॉटर (शुद्ध पाणी) विकत घेऊन पीत आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांत ‘शुद्ध’ पाण्याचा नवा धंदा जोमात सुरू झाला आहे. 

कृष्णा - वारणा नदीपात्रात दिवसेंदिवस विविध उद्योगधंद्यातून तसेच औद्योगिक वसाहतीमधील मोठ्या प्रमाणात रसायनयुक्त पाणी मिसळत आहेत. त्यामुळे पाण्याला उग्र वास येतो. विशिष्ट प्रकारचा काळपट रंग दिसतो. तेलासारखा तवंग सर्वत्र पसरला आहे. त्यामुळे अनेक गावांत काविळीसारख्या गंभीर आजाराचे रुग्ण वाढत चालले आहेत. दूषित पाण्यामुळे  आरोग्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. केवळ दूषित पाण्यामुळेच हे आजार होत असल्याची  खात्री नदीकाठच्या ग्रामस्थांची झाली आहे. त्यामुळे शुद्ध पाणी पिणे हाच एकमेव साथीतून वाचण्यासाठी आधार ठरत आहे. 

तालुक्यातील अनेक गावांत पिण्याचा पाणीपुरवठा करण्यासाठी जलशुद्धीकरण यंत्रणा आहे. मात्र या यंत्रणेतून केवळ पाणी निर्जंतूकच होते. तरीदेखील त्या पाण्यामध्ये रसायनांचा काही प्रमाणात अंश शिल्‍लक राहतो. याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. गंभीर समस्या निर्माण होण्यावर होतो. ताप, थंडी, खोकला, थकवा, उलटी, जुलाब अशा लक्षणातून छोटे-मोठे आजार डोके वर काढतात. त्यामुळे नदीकाठच्या लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शासनाकडे दूषित पाण्याबद्दल वारंवार तक्रार करूनदेखील कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून होत नाही. याबद्दल कमालीचा संताप ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे. 

दूषित पाण्यामुळे होणार्‍या काविळीसारख्या गंभीर आजाराची धास्ती घेतलेले ग्रामस्थ आता आरोग्यासाठी पडेल ती किंमत मोजून  पाणी विकत घेऊन पीत आहेत. परंतु हे विकतचे पाणी सामान्यांना परवडणारे नाही. तरीदेखील आरोग्यासाठी त्यांच्यासमोर दुसरा पर्याय नाही. 

नदीकाठी गाव असूनही नदीचेच  पाणी पिण्यालायक राहिलेले नाही. त्यामुळे पाणी विकत घेऊन पिण्याची वेळ लोकांवर आली आहे. गावागावांत मिनरल वॉटर म्हणून 30 रुपयांना 20 लिटरचा जार विकला जातो. दिवसेंदिवस त्याची मागणी आता वाढू लागली आहे.