Thu, Nov 15, 2018 09:49होमपेज › Sangli › आरक्षण सोडतीची उद्या रंगीत तालीम

आरक्षण सोडतीची उद्या रंगीत तालीम

Published On: Mar 18 2018 1:06AM | Last Updated: Mar 18 2018 12:06AMसांगली : प्रतिनिधी

महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना व आरक्षण सोडत मंगळवारी (दि. 20) सकाळी 11 वाजता खुली होणार आहे. यातून 20 प्रभागांसाठी भावी 78 नगरसेवकांसाठी इच्छुकांचे रणांगण खुले होणार आहे. त्यासाठी दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात जय्यत तयारी करण्यात आली आहे. दरम्यान, सोमवारी  आरक्षण सोडतीची रंगीत तालीम होणार आहे. 

महापालिकेची  निवडणूक जूनच्या अखेरीस होणार आहे. या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शन तत्त्वानुसार प्रारूप प्रभाग रचना तयार झाली आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात 78 नगरसेवकांसाठी 20 प्रभाग निश्‍चित करण्यात आले आहेत.  

मागासवर्गीय आरक्षणासह प्रभागरचनेला निवडणूक आयोगाने नुकतीच मान्यता दिली आहे. आता अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिलांची आरक्षण सोडत  होणार आहे.

आयुक्‍त रवींद्र खेबुडकर व उपायुक्‍त सुनील पवार यांनी प्रमुख अधिकार्‍यांसह दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात शनिवारी तयारीचा आढावा घेतला. मंगळवारी सकाळी आठ वाजता नाट्यगृह खुले करण्यात येणार आहे. त्यानंतर 20 प्रभाग व त्याच्या चतु:सीमा दर्शविणारे नकाशे कार्यालयाबाहेर लावण्यात येणार आहेत. सकाळी अकरा वाजता आरक्षण सोडतीचा कार्यक्रम होणार आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून आरक्षण निश्‍चित केले जाणार आहे. त्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. 

Tags : ward, structure, reservation, Tuesday, municipal, election,