Sun, May 26, 2019 13:23होमपेज › Sangli › प्रभाग तसा चांगला, पण समस्यांनी घेरला

प्रभाग तसा चांगला, पण समस्यांनी घेरला

Published On: May 30 2018 2:22AM | Last Updated: May 29 2018 7:11PMसांगली : प्रतिनिधी

सांगली महापालिका क्षेत्रातील चांगला व सुशिक्षितांचा परिसर म्हणून ‘प्रभाग 17’ ची ओळख आहे. रेव्हिन्यू कॉलनी, ओव्हरसियर कॉलनी, गुलमोहर कॉलनी, चांदणी चौक, शंभरफुटी रस्ता उत्तरभाग व दक्षिण भाग, विकास चौक, हसरा चौक, धामणी रोड, दत्तनगर पश्‍चिम, एस. टी. कॉलनी, नागराज कॉलनी, नेमिनाथनगर असा हा परिसर आहे.  प्रभाग तसा चांगला, पण समस्यांनी घेरला, अशी अवस्था या प्रभागाची झाली आहे. 

महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर खराब रस्त्यांचे भाग्य उजाडले आहे. रस्ते चकचकीत झाले आहेत. काही रस्त्यांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पण काही रस्त्यांची दुर्दशा काही संपता संपेना झाली आहे. किसान चौक ते पूर्वेकडे जाणारा रस्ता अजूनही खड्ड्यांचाच आहे. शनिमंदिर ते बापटमळा, तीर्थंकर बंगला ते विकास चौक हा रस्ताही खराब आहे. प्रभागातील अन्य काही अंतर्गत रस्त्यांची अवस्था अशीच बिकट आहे. कचरा उठावचा प्रश्‍न तर प्रभागात जवळपास सर्वत्र सारख्याच प्रमाणात भेडसावतो आहे. पावसाळ्यात या कचर्‍याची मोठी दुर्गंधी नागरिकांना सहन करावी लागते. विकास चौक परिसरात मोठी ड्रेनेज उघड्यावरच आहे. दुर्गंधी, डासांमुळे नागरिक वैतागले आहेत.  प्रभागात अनेक ठिकाणी मोकळे प्लॉट घाणीचे केंद्र बनले आहेत. मोकळ्या प्लॉटमध्ये गवत वाढते, पाणी साचून राहते. घंटागाडी नियमितपणे येत नाही. अनेक ठिकाणी कचरा कोंडाळा नाही. मोकळ्या जागेवरच कचरा अस्ताव्यस्त पसरलेला दिसतो. पार्किंगची व्यवस्था नाही. काही ठिकाणी पथदिवे बंद असल्याने रात्री अंधाराचे साम्राज्य असते. मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट आहे. विस्तारित भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. खुले भूखंड विकसित होणे गरजेचे आहे. विस्तारित भागात वॉकिंग ट्रॅक, उद्यान आदी सुविधा आवश्यक आहेत.

समस्या प्रभागाच्या 17

लोकसंख्या : 25765

परिसर : राममंदिर ते शंभरफुटी रस्ता पूर्वभाग, रेव्हिन्यू कॉलनी, ओव्हरसियर कॉलनी, गुलमोहर कॉलनी चांदणी चौक, शंभरफुटी रस्ता उत्तरभाग व दक्षिण भाग, हसरा चौक, धामणी रोड, दत्तनगर पश्‍चिम, एस. टी. कॉलनी, नागराज कॉलनी, नेमिनाथनगर.