Thu, Apr 18, 2019 16:13होमपेज › Sangli › प्रभाग रचनेविरोधात उच्च न्यायालयात जाणार

प्रभाग रचनेविरोधात उच्च न्यायालयात जाणार

Published On: Apr 15 2018 11:02PM | Last Updated: Apr 15 2018 10:42PMसांगली : प्रतिनिधी

महापालिकेची निवडणुकीसाठी प्रभाग रचना करताना अनेक गंभीर चुका झालेल्या आहेत. त्यासंदर्भात तत्कालीन नगरपलिकेचे नगराध्यक्ष व माजी नगरसेवक रामभाऊ घोडके यांनी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांसमोर हरकती सादर केल्या. त्यामध्ये अनेक गंभीर चुका झाल्याचे घोडके यांनी निदर्शनास आणून दिले. यासंदर्भात तात्काळ निर्णय घेऊन महापालिकेची फेरप्रभाग रचना करावी, अन्यथा उच्च न्यायालयात जाणार असा इशारा घोडके यांनी दिला आहे.

सर्कीट हाऊस मध्ये महापालिकेच्या प्रभाग रचनेच्या हरकतींवर सुनावणी झाली. यावेळी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील, आयुक्त रविंद्र खेबुडकर, निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. पी. अनभलगन हे उपस्थित होते.  

महापालिकेची निवडणुकीसाठी प्रशासनाने नुकतीच प्रभाग रचना जाहीर केली. त्यानुसार कोणाच्या हरकती असल्यास लेखी मांडावे, असे प्रशासनाने जाहीर केले होते. त्यानुसार माजी नगरसेवक घोडके यांनी विविध प्रभागात चुकीच्या पद्धतीने रचना झाल्याचे लेखी सादर केले. त्यामध्ये प्रभाग रचना सुरू करीत असताना सर्वप्रथम उत्तरेकडून ईशान्य (उत्तर-पूर्व) त्यानंतर पूर्व दिशेकडून येवून पश्‍चिमेकडे प्रभाग रचना करीत सरकणे गरजेचे आहे. आणि त्याचा शेवट दक्षिणेत करावा. तसेच प्रभागांना क्रमांकही त्याच पद्धतीने दिले पाहिजे असा राज्य निवडणूक आयुक्तांचा आदेश आहे. आतापर्यंतच्या निवडणुकीवेळी प्रभागाची सुरुवात उत्तरेला म्हणजे कर्नाळ रस्त्यापासून केली जात होती. परंतु यावेळी आदेशाचा भंग करून ती महापालिकेचा मध्य काढून कुपवाडपासून सुरुवात करण्यात आली आहे. हे पूर्णपणे चुकीचे असल्याचे निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच प्रभाग 10 पर्यंतचा भाग पश्‍चिमेकडे सरकत गेलेला आहे. त्यानंतरचे 11 पासूनचे प्रभाग हे पश्‍चिमेकडे सरकणे जरूरीचे असताना ते पुन्हा उत्तरेकडे सरकविण्यात आलेले आहे. यामध्येही आयुक्तांच्या आदेशाचा भंग करण्यात आलेला आहे. यामध्ये प्रभाग 15, 17, 18 हे सुद्धा प्रभाग चुकीच्या दिशेने सरविण्यात आले आहेत. 

यामध्ये दुसरी चूक म्हणजे सन 2013 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये 2001 च्या जनगनणेनुसार 4 लाख 36 हजार 781 इतकी महापालिकेची सदस्य संख्या होती. त्यानुसार 78 सदस्य संख्या करण्यात आली. सध्या जाहीर झालेल्या निवडणुकीसाठी 2011 ची जनगनणानुसार महापालिकेची लोकसंख्या ही 5 लाख 2 हजार 793 इतकी सदस्य संख्या झालेली आहे. त्यामध्ये 66 हजार 52 इतकी लोकसंख्येमध्ये वाढ झालेली आहे. परंतु सदस्य संख्येमध्ये वाढ न होता  78 इतकीच सदस्य संख्या ठेवण्यात आली आहे. त्यामुळे प्रभाग रचनेमध्ये आणखी सदस्य संख्या वाढवून प्रभाग रचना करावी, अशी मागणी घोडके यांनी केली आहे.

सांगलीवाडी येथील प्रभाग क्रमांक 13 मध्ये 16 हजार 953 इतकी लोकसंख्या दाखविण्यात आली आहे.  सन 2013 मध्ये झालेल्या निवडणुकीवेळी सांगलीवाडीतील प्रभाग 19 मध्ये 16 हजार 943 इतकी लोकसंख्या होती. 2001 नंतर 2011 मध्ये 10 वर्षांनी जनगणना झालेली आहे. त्यामुळे या प्रभागात 10 वर्षात केवळ 10 च लोकसंख्या कशी वाढली, असा सवाल घोडके यांनी केला. त्यामुळे हा प्रकार संशयास्पद वाटतो. याच ठिकाणी 2013 मध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या 1929 होती, अनुसूचित जमातीची संख्या 479 इतकी होती. परंतु सध्या या ठिकाणी अनुसूचित जातीची संख्या केवळ 1987 तर जमातीची संख्या 143 झाली आहे. यामध्येही चूक झालेली दिसते, असे घोडके यांनी दिर्शनास आणून दिले. ती चूक प्रशासनाने मान्य केली. 

त्याबरोबर मिरजेतील प्रभाग 16 व 20 या दोन्ही प्रभागाच्या व्याप्तीमध्ये कनवाडकर हौद असा उल्लेख आलेला आहे. वस्तुस्थिती पाहता कनवाडकर हौद हा भाग प्रभाग क्रमांक 20 मध्ये आढळून येतो. हे कलम 16 मधील आदेशाचा भंग असल्याचे घोडके यांनी दाखवून दिले. त्यामुळे वरील हरकती पाहता सर्व प्रभागांमधील झालेल्या चुकांची दुरुस्ती करून फेरप्रभाग रचना तातडीने करावी, अशी मागणी घोडके यांनी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांसमोर केली. अन्यथा याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करू, असा इशाराही यावेळी घोडके यांनी दिला.