Mon, Jul 22, 2019 04:43होमपेज › Sangli › भाजपच्या खासदार, आमदारांनी काय दिवे लावले

भाजपच्या खासदार, आमदारांनी काय दिवे लावले

Published On: Jul 03 2018 1:54AM | Last Updated: Jul 02 2018 11:33PMसांगली : प्रतिनिधी

येथील जनतेने भाजपचे खासदार, आमदार निवडून दिले, मात्र त्यांनी काय दिवे लावले? आता  निवडणुकीत त्यांनी कितीही पैशांचा वापर केला तरी त्यांच्या धनशक्तीला आमची शिवशक्ती गाडल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा पर्यावरणमंत्री रामदार कदम यांनी  सोमवारी येथे  पत्रकार परिषदेत दिला.मंत्री कदम यांच्या हस्ते शिवसेना कार्यालयाचे उद्घाटन   झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. संपर्क प्रमुख नितीन बानुगडे - पाटील, जिल्हा प्रमुख संजय विभूते, आनंदराव पवार, जिल्हा संघटक दिगंबर जाधव, बजरंग पाटील, शेखर माने, शंभूराज काटकर आदी उपस्थित होते. 

मंत्री कदम म्हणाले, भाजप शिवसेनेचे बोट पकडून मोठा झाला. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपद मिळवून देण्यात शिवसेनेचा सिंहाचा वाटा आहे.  तोच भाजप सेना संपावायला निघाला होता. विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी युती तोडून आणि मोठी लाट असून सुद्धा सेनेचे 63 आमदार निवडून आले. ती लाट ओसरल्यानंतर आता भाजपला सेनेची गरज भासते आहे. शिवसेनेच्या मतदीशिवाय भाजपचा पंतप्रधान होणे अशक्य आहे. त्यामुळे युती करण्यासाठी या पक्षाचे नेते आमच्या मागे लागले आहेत. मात्र सर्व निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व ठिकाणी सेना मोठ्या ताकदीने निवडणूक लढवणार आहे. कोणत्याही स्थितीत महापालिकेवर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. सध्याची निवडणूक ही लोकसभा निवडणुकीची नांदी असेल.  ते म्हणाले, सांगली महापालिकेचे अंदाजपत्रक 700 कोटींचे आहे. तरी सद्धा शहराचा विकास फारसा झाला नाही. आमदार 30 कोटींचा निधी आणल्याचे सांगत आहेत, मात्र तो  कोणाच्या खिशात गेला, याचा जाब जनता विचारल्याशिवाय राहणार नाही.  अनेक वर्षांपासूनशेरीनाल्याचा प्रश्‍न काँग्रेस- राष्ट्रवादीला सोडवता आला नाही. त्यामुळे या निवडणुकीत चमत्कार झालेला दिसेल. 

पवार गट शिवसेनेत आलाच नाहीः मंत्री कदम

माजी आमदार संभाजी पवार यांचा गट अलिकडे  शिवसेनेच्या कार्यक्रमात फारसा दिसत नाही. आजच्या  कार्यक्रमासही पृथ्वीराज पवार किंवा गौतम पवार यापैकी कोणीही उपस्थित नव्हते. त्याबाबत मंत्री कदम यांना विचारले असता ते म्हणाले, त्यावेळी पवार तेवढे आमच्याकडे आले होते. त्यांचा गट शिवसेनेत आलाच नव्हता. त्यामुळे त्या गटाचा संबंधच येत नाही.