Tue, Jun 18, 2019 20:18होमपेज › Sangli › निधी नसेल तर योजना कशाला सुरू ठेवता?

निधी नसेल तर योजना कशाला सुरू ठेवता?

Published On: Jun 06 2018 1:44AM | Last Updated: Jun 05 2018 10:16PMइस्लामपूर : शहर वार्ताहर

गेल्यावर्षीचे अनुदानाचे पैसे लाभार्थ्यांना मिळत नसतील तर या योजना कशाला सुरू ठेवता, असा सवाल करीत सदस्यांनी पशु संवर्धन अधिकार्‍यांना धारेवर धरले.

वाळवा पंचायत समितीची  मासिक सभा सभापती सचिन हुलवान यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपसभापती नेताजी पाटील, अतिरिक्त गटविकास अधिकारी  सुहास बुधवले  उपस्थित होते. 
गेल्यावर्षीचे कुक्कुटपालन, शेळीपालनाचे अनुदान अजूनही लाभार्थ्यांना मिळाले नाही, अशी माहिती सदस्य शंकर चव्हाण यांनी पशुसंवर्धन अधिकार्‍यांना दिली. त्यावेळी अधिकारी डॉ. रा.वि. देवकुळे यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. वारंवार प्रस्ताव पाठवूनही गेल्यावर्षीच्या अनुदानाची रक्कम मिळत नसेल तर या योजना कशाला राबविता, अशी आक्रमक भूमिका सदस्यांनी घेतली.
 जि.प. शाळेत विद्यार्थ्यांसाठी पुस्तके आली  आहेत. शाळेत येणार्‍या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले जाणार आहे अशी माहिती देऊन गटशिक्षणाधिकारी मोहन गायकवाड म्हणाले, काही अनधिकृत शाळांनी वर्ग सुरू केले असतील तर त्यांना एक लाखाचा दंड केला जाईल. 

बहुसंख्य ग्रामपंचायतीचे व्यवहार  ऑनलाईन होणार असल्याचे  अधिकार्‍यांनी सांगितले. तालुक्यातील अत्यावश्यक रस्ते, पाणंद रस्त्यांचे प्रस्ताव द्यावेत. त्याबाबत लवकर कार्यवाही करू, असे आश्‍वासन उपअभियंता डी.एम. देसाई यांनी दिले. 

कार्वे येथे वीजतारा चिकटू नये म्हणून त्यावर दगड बांधण्यात आले आहेत, असे  धनश्री माने यांनी महावितरण अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणले. इस्लामपूर-चिकुर्डेच्या बसफेर्‍या कमी केल्या आहेत.  शाळा सुरू होत असल्याने  त्या  वाढवाव्यात  अशी मागणी सुप्रिया भोसले यांनी केली.  परिवहन अधिकारी एस.ए. देसाई यांनी रस्त्यांची कामे सुरू असल्याने तेथील फेर्‍या कमी केल्या असल्याचे सांगितले. 

बारा गावांतील पेयजल योजना अजूनही ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित झालेल्या नाहीत अशी माहिती देण्यात आली. आष्टा ग्रामीण रुग्णालयाचा आढावा घेण्यात आला.  
आनंदराव पाटील, पी.टी. पाटील, वैशाली जाधव, सुप्रिया भोसले, रुपाली सपाटे यांनी चर्चेत भाग घेतला.